Disha Shakti

इतर

ताहराबाद येथील सुट्टीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथील बेलकरवाडीतील तसेच हिमाचल प्रदेश येथे भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर कार्यरत असलेले सुट्टीवर आलेले जवान ज्ञानेश्वर बाबासाहेब ढवळे (वय 24) यांचा सोमवार दि.25 सप्टेंबर रोजी पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे काल दुपारी 4 वाजता घडली.

बेलकरवाडी येथील पाझर तलाव मागील आठवड्यापर्यंत कोरडा होता. गेली दोन-तीन दिवसांपासून या परिसरात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे पाझर तलावात 75 टक्के पाणीसाठा झाला. 30 ऑगस्ट रोजी सुट्टीवर आलेले ज्ञानेश्वर ढवळे आपल्या मित्रांबरोबर उत्सुकतेने पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे व दम लागल्यामुळे पाण्यात बुडाले. सोबत असलेल्या मित्रपरिवाराने त्यांना वाचविण्यासाठी आरडाओरडा केला. मात्र, ज्ञानेश्वरला त्या तळ्यातील पाण्याने आपल्या कवेत घेतले. त्यानंतर स्थानिक तरूणांनी त्यांना पाण्याच्या बाहेर काढून उपचारासाठी राहुरी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल केले.

परंतू तेथील वैद्यकिय आधिकार्‍यांनी ज्ञानेश्वर यांना उपचारादरम्यान मयत घोषित केले. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दि. 30 ऑगस्ट रोजी सुट्टीवर आलेले मेजर ज्ञानेश्वर आज दि. 26 सप्टेंबर रोजी आपल्या सेवेवर रुजू होणार होते. बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथील मित्राबरोबर ज्ञानेश्वर सुट्टीवर आले होते. ते दोघेही पुणे येथून हिमाचल येथे जाणार होते. पण नियतीपुढे कोणाचेही काही चालत नाही. त्या मित्रालाही ही वार्ता कळताच मोठा मानसिक धक्का बसला.

या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकुल वातावरणामुळे ताहाराबादमधील सर्व दैनंदिन व्यवहार बंद झाले आहे. आज दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी शासकीय इंतमामात त्यांचा अंत्यविधी होणार आहे. ज्ञानेश्वरच्या पश्चात आई, वडील, चुलते, चुलती, मोठा भाऊ व आजी असा परिवार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!