देगलूर प्रतिनिधी / ज्ञानोबा सूरनर : योगायोगाने यावर्षी गणेश विसर्जन आणि ईदचा सण एकदाच येत आहेत. हे दोन्ही सण समाज बांधवांनी आनंदाने आणि उत्साहात साजरे करावेत ;परंतु आनंदाच्या भरात समाजातील अन्य घटकांना त्रास होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. असे विचार देगलूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांनी शांतता समितीच्या बैठकीस संबोधित करताना व्यक्त केले.
दि.२७ सप्टेंबर रोजी देगलूर प्रशासनाच्या वतीने शंकरराव चव्हाण सभागृह पंचायत समिती देगलूर येथे गणेश उत्सव आणि ईद सणाच्या निमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीपूर्वी गणेश विसर्जन आणि ईदची मिरवणूक एकाच दिवशी येत असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक दोन दिवस पुढे ढकलून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.याप्रसंगी कैलास एजगे, ऍड.परवेज काजी, अॅड.मोहसीन अली, महेश पाटील, मच्छिंद्र गवाले,प्रा. निवृत्ती भागवत, जेजेराव पाटील, शशिकांत पटणे आदींनी डीजेची परवानगी, शहरातील रहदारी, विजेचा प्रश्न, पत्रकारांना निमंत्रण, पोलीस मित्र समितीची स्थापना इत्यादी मुद्दे मांडून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी पुढे बोलताना कुलदीप जंगम म्हणाले की, डीजेची मागणी अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे;परंतु सर्वोच्च न्यायालयाने आवाजाची विशिष्ट मर्यादा आखून दिली असल्यामुळे डीजेला परवानगी देणे शक्य नाही. डीजेला परवानगी दिली तर तो सर्वोच्च न्यायालयाचा आदेशाचा अवमान ठरेल. त्यामुळे परवानगी देता येणार नाही.प्रशासनाला सूचना करताना ते म्हणाले की, विसर्जन मिरवणूक होऊन संपेपर्यंत विद्युत पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवावा, जुन्या बसस्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे, पार्किंग सुविधा उभे करावी.
याप्रसंगी तहसीलदार राजाभाऊ कदम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुंदर बोदर उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक संजय हिबारे, अभियंता नरेंद्र टेकाळे, माधवराव मिसाळे गुरुजी, तारकांत पाटील, संजय जोशी, धोंडीबा मिस्त्री, प्रवीण मंगनाळे, शरीफ मामू, बालाजी मैलागीरे सहाय्यक अभियंता अमित त्रिवेदी, सादिक मरखेलकर यांच्यासह तालुक्याच्या अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, शांतता समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक घोंगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोबाडे यांनी केले.शांतता समितीची बैठक यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत मोरे, डिएसबीचे सुनील पत्रे आदी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply