राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सूरशे : अनंत चतुर्दशी निमित्त गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी राहुरी शहरातील भाजी मंडई परिसरात मागील भांडणाच्या कारणावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. एका गटातील तरुणांकडून दुसर्या गटातील दोन तरुणांना फायटर व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण झाल्याने ते दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राहुरी शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरात असलेल्या एका वसाहतीत काही तरुणांचे दोन गट निर्माण झाले आहेत. काही वर्षांपासून या दोन्ही गटांत क्षुल्लक कारणावरून धुमश्चक्री होत असते. काही महिन्यांपूर्वी या ठिकाणी दोन गटांत मारहाण होऊन गावठी कट्ट्यातून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्या घटनेत माजी नगरसेविका सोनाली बर्डे या गोळी लागल्याने जखमी झाल्या होत्या. त्या घटनेत त्या बालंबाल बचावल्या होत्या.
त्यावेळी राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल झाले होते. त्या घटनेतील दोन्ही गटांतील आरोपी सध्या जामिनावर आहेत. त्या घटनेचे पडसाद उमटत गुरूवार दि. 28 सप्टेंबर 2023 रोजी रात्री आठ वाजे दरम्यान पुन्हा त्या दोन गटांत शनीचौक परिसरातील भाजी मंडई येथे मारहाण झाली. लोखंडी फायटर व लाथाबुक्क्यांनी झालेल्या बेदम मारहाणीत करण भारत माळी व पप्पू गुलाब बर्डे हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. तर पवन साळुंके व किरण दत्तू बर्डे हे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
त्यापैकी करण माळी या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. करण माळी व पप्पू बर्डे या दोघांवर अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पवन रमेश साळुंके याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अंकुश नामदेव पवार, अमर नामदेव पवार, सुमित अरुण दळवी, तुषार अरुण दळवी, अनिल रावसाहेब दळवी या पाच जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Leave a reply