दिशाशक्ती प्रतिनिधी : भारत कवितके या माझ्या जेष्ठ मित्राने डोळ्यात पाणी व ओठांवर हसू अशा अवस्थेत ८ आक्टोंबर २०२३ रोजी आपल्या संघर्षमय पण यशस्वी जीवनाची ६४ वर्षे पूर्ण केली. सोलापूर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र असलेले पंढरपूर हे त्यांचे मूळ गाव.१९७८ साली १२ वी आर्टस् पास होताच भारत कवितके यांनी सोलापूर व पंढरपूर शहरात नोकरी शोधायला सुरुवात केली,पण का कोण जाणे त्यांना तिथे नोकरी लागलीच नाही, खूपच मुलाखती दिल्या. नंतर मुंबईला नातेवाईकांच्या मदतीने १ नोव्हेंबर १९७९ रोजी पंढरपूर गाव सोडून नोकरी शोधायला मुंबई कांदिवली येथे आले.
आपला भूतकाळ सांगताना भारत कवितके भावुक होऊन सांगतात की.,” १ नोव्हेंबर १९७९ वेळ साधारण रात्री ८ ची पंढरपूर बस स्थानकात पंढरपूर मुंबई एसटी उभी होती, प्रवासी फारसे नव्हते. मी काही सा गोंधळलेल्या अवस्थेत एसटी त बसून वर ठेवलेल्या पत्र्याच्या पेटीकडे वारंवार पाहत होतो, त्यात शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, जन्म तारखेचा दाखला एका वर्तमानपत्राच्या घडी मध्ये दोन दिवसांपूर्वीच ठेवलेला होता. खिडकीतून बाहेर आई अप्पांकडे अश्रू भरलेल्या डोळ्यांनी पाहत होतो. जोरजोरात रडायला येत होते. आपलासा वाटणारा गाव परका होत असल्याची जाणीव करून देत होता.मन उदास, व्याकूळ होत होते.
अप्पांनी तिकीट काढून त्या बरोबर दिलेल्या एकेक रुपयांच्या पंधरा नोटा मी विजारीच्या खिशात ठेवल्या.त्यांना मी सारखा सारखा तपासून पाहत होतो. ती १५ रुपये ची रक्कम त्या काळी फार मोठी वाटत होती.तेथूनच माझ्या जीवनाचा प्रवास अधिकच तीव्र संघर्षमय झाला.मी आयुष्यात खूपच सोसलं, अनुभवलं, आणि पचविले ही मुंबई ते नोकरी शोधायला आल्यावर अनेक पावसात प्लॅस्टिक कागद डोक्यावर घेऊन रात रात भर बस स्थानक वर (सिटी बस स्टॉप)उभे राहून काढल्या.
कारण मुंबईत पडणाऱ्या पावसात मला झोपायला जागा नव्हती. गालावरुन ओघळणाऱ्या पावसाच्या पाण्यात डोळ्यांतील पाणी, अश्रू मिसळून जायचे. पावसात मी रडतोय हे कुणालाच कळायचं नाही. गाव आठवून पोटभरून, मनसोक्त मी रडायचं. कधी कधी कांदिवली रेल्वे स्टेशनच्या चार नंबरच्या प्लॅटफॉर्म वर भिकारी, चरसी, दारुडे, यांच्या भोवती झोपून अनेक रात्री घालविल्या. उग्र,घाण, दुर्गंधी छळायची. पुढे मी अंधेरी ते दहिसर रेल्वे स्टेशनच्या होमगार्ड अधिकारी म्हणून नाईट ड्युटीवर निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावताना माझ्या होमगार्ड ना सांगायचो, अरे बाबांनो पावसाचे दिवस आहेत भिकारी झोपले असतील तर त्यांना हुसकावून लावू नका, कदाचित त्या मध्ये एखादा भारत कवितके असू शकेल.
संघर्षमय जीवन जगताना अनेकदा मुंबई सोडून गावी जावे वाटायचं.मग गावचा लहानपणीचा संघर्ष डोळ्या समोर उभा राहायचा, शेवटी येईल त्या परिस्थितीशी सामना करीत झुंजत, लढत राहिलो. गावी लहान असताना दहा पैसे प्रमाणे एक शेणाची लोखंडी पाटी भरुन विकण्यासाठी बैलांच्या बाजारात उन्हात अनवाणी पायाने फिरताना मीच मला आठवायचो, छिद्रा छिद्राची फाटकी बनियन सावरत सावरत फिरणारा मीच मला आठवायचो, लहानपणी उपाशी पोटी रात्री अंगणात आकाशातील चांदण्या मोजत मोजत कंटाळून भूक विसरून झोपी जायचो,आण स्वप्नात मात्र पोट भरुन हसायचो.
तो मीच मलाआठवायचो. ज्युनिअर कालेज ला असताना फाटलेली विजार कुणाला दिसू नये म्हणून एकलकोंडा बनून मित्रांपासून दूर दूर जाणारा मी मला आठवायचो, कालेज ची फी भरण्यासाठी वणवण भटकणारा, कुणीही आर्थिक मदत न केल्याने मुदतीअंती कालेज च्या गेट वर स्वतः वरच चिडून हमसून हमसून रडणारा मीच मला आठवायचो, पंढरपूर मध्ये आषाढी कार्तिकी यात्रेवेळी गोपाळपूर पासून पंढरपूर पर्यंत च्या दर्शन रांगेत लेमन गोळ्या विकणारा मीच मला आठवायचो, माझ्या मुंबईतील घराच्या खिडकीतून आज पावसाला पाहताना मला मागील दिवस आठवतात.
नको नको म्हणत असताना अंगावर काटा येतो.” वाचणं, लिहीणे, गाणे ऐकणे, प्रवासात मनसोक्त फिरणे, चविष्ट चटकदार खाणे, चांगल्या कलाकृती ला मनापासून दाद देणे, हे भारत कवितके यांनी जोपासलेले छंद सवयी आहेत.भारत कवितके हे एक संवेदनशील कवी, एक सृजनशील लेखक, निर्भिड पत्रकार आणि स्वतः ला झोकून देत सामाजिक कार्य करणारे प्रामाणिक कृतीशील क्रियाशील सामाजिक कार्यकर्ते आहेत. पत्रकारिता, साहित्य,व सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल भारत कवितके यांना आतापर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र अशा विविध राज्यातून विविध संस्था चे पुरस्कार प्राप्त झालेले असून पुरस्कार संख्या १०४३ झाली आहे.मोहम्मद रफी, मुकेश किशोर कुमार महेंद्र कपूर हे त्यांचे आवडते गायक, भारत कवितके यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
सर्वंच पुस्तकांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.१ नोव्हेंबर २०१४ होमगार्ड अधिकारी म्हणून सेवा निवृत्त व १ नोव्हेंबर २०१७ रोजी मुंबई महानगर पालिका आरोग्य खात्यातून भारत कवितके सेवा निवृत्त झाले. निवृतीनंतर पत्रकार म्हणून ते अनेक दैनिक साप्ताहिक मासिक दिवाळी अंकातून लिखाण करत आहेत. वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांनी एम.ए.पास केले तेही प्रथम श्रेणीत. नोकरीत यामुळे त्यांना बक्षीस म्हणून दोन जादा वेतन श्रेणी दिल्या गेल्या.
महाराष्ट्रातील अनेक लहान मोठ्या पदावर भारत कवितके कार्यरत आहेत. श्रीसिध्दिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था चे महासचिव,जय महाराष्ट्र सेवा मंडळ चे संस्थापक अध्यक्ष, सार्वजनिक गणेश मित्र मंडल चे प्रमुख सल्लागार व माजी अध्यक्ष, झुंजार धनगर समाज संस्थेचे कार्य अध्यक्ष, वगैरे वगैरे पदावर भारत कवितके आपले कार्य चोखपणे बजावत आहेत.असा माझा मित्र भारत कवितके आलेल्या मोठ मोठ्या संकटांना चुटकीसरशी संपवतो,पण कधी कधी जीवनात आलेल्या ताण तणावामुळे सशा सारखा घाबरतो सुध्दा.आयुष्य उसवताना. हे त्यांचे आत्मचरित्र थोड्या अवधीत अत्यंत लोकप्रिय झाले. माझ्या या अवलिया मित्राचा रविवार दिनांक ८ आक्टोंबर २०२३ रोजी ६४ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्त त्यास लाख लाख शुभेच्छा व सामाजिक, पत्रकारिता साहित्य या क्षेत्रात अजून जोमाने काम करायला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. प्रमोद सूर्यवंशी.
ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक भारत कवितके यांची संघर्षमय पण यशस्वी जीवनाची ६४ वर्षे : प्रमोद सूर्यवंशी

0Share
Leave a reply