राहुरी प्रतिनिधी / प्रशांत जोशी : राहुरी तालुक्यातील उंबरे येथील ग्राम विकास अधिकार्यांना एका ग्रामपंचायत सदस्याने ग्राम स्वच्छता अभियाना दरम्यान आर्वाच्च भाषेत शिविगाळ केल्याने त्याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवार दि. 1 ऑक्टोबर रोजी घडली.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील ग्रामविकास अधिकारी मुरलीधर नारायण रगड, (वय- 55) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, दि. 1 ऑक्टोबर 2023 रोजी शासनाच्या आदेशानुसार एक तास श्रमदान, लोक सहभागातून स्वच्छता मोहीम राबवित असताना सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सदस्य कैलास चंद्रभान अडसुरे यांनी हनुमान मंदिर परिसर येथे येऊन मला शिविगाळ केली. अर्वाच्च भाषा वापरून धमकी दिली. ‘येथून बदली करून निघं’ असे म्हणून अपमान केला. तसेच ‘थोड्या दिवसांत वेगळे काहीतरी भाऊसाहेबांच्या बाबतीत घडवून आणेल’ असेही म्हटले आहे.
यावेळेस ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी तसेच जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते. कैलास चंद्रभान अडसुरे हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. परंतु बेजबाबदार बेताल वक्तव्य व गुंड प्रवृत्तीची भाषा व जनसामान्यांत माझी प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आडसुरे हे बेकायदेशीर काम करण्यास भाग पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर करित आहेत. भविष्यात दैनंदिन कामकाज करीत असताना माझ्या जीवाचे बरेवाईट झाल्यास व माझ्या कुटुंबाला त्रास झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी कैलास अडसुरे यांची राहील. तरी त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून योग्य ती समज देण्यात यावी.
मुरलीधर रगड यांच्या फिर्यादीवरून कैलास चंद्रभान अडसुरे, रा. उंबरे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उंबरेच्या ग्रामविकास आधिकार्यांना शिवीगाळ ग्रामपंचायत सदस्याविरुध्द अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

0Share
Leave a reply