Disha Shakti

क्राईम

पाथर्डीत दारू प्यायला पैसे देण्याच्या वादातून लहान भावाला कुर्‍हाडीचे घाव घालून केले ठार

Spread the love

अ.नगर जिल्हा प्रतिनिधी / युनूस शेख :  आई वडील दारू प्यायला पैसे देत नाहीत. मात्र लहान भावालाच कसे पैसे देतात. याचा राग येऊन मोठ्या भावाने झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून जागीच ठार केल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील फुंदे टाकळी, खिळा वस्ती येथे आज दि.9 ऑक्टोंबर रोजी सकाळी घडली आह़े.

बाबाजी विष्णू फुंदे वय (28) असे हल्ला करणार्‍या संशयिताचे नाव आहे. तर या घटनेत त्याचा लहान भाऊ निलेश विष्णू फुंदे (26) याचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाथर्डी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फुंदे कुटुंबिय शेती व्यवसाय करून उपजीविका करतात. मोठा मुलगा बाबाजी दारू पिण्यासाठी आई वडिलांकडे वेळोवेळी पैसे मागत असे. पैसे मिळाले नाही की आई-वडिलांशी वाद घालत असे. लहान मुलगा निलेश हा वाद घालू नको म्हणून मोठ्या भावाला नेहमी समजावून सांगत असे. याचा बाबाजीला राग होता.

सोमवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बाबाजीने दारू पिण्याकरता आई-वडिलांकडे पैसे मागितले. मात्र त्याला पैसे दिले नाहीत. ‘तुम्ही मला पैसे देत नाहीत मात्र लहान भाऊ निलेशला नेहमीच पैसे देता, त्याला एकदाचा संपवूनच टाकतो’ असे म्हणत बाबाजी ने घरातील कुर्‍हाड घेऊन झोपलेल्या लहान भावाच्या डोक्यात घाव घातला. कुर्‍हाडीच्या घावाने गंभीर जखमी झालेला निलेश जागीच बेशुद्ध झाला होता. शेजार्‍याच्या मदतीने त्याला पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून डॉक्टरांनी अहमदनगरला हलवण्याचे सांगितले अहमदनगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच निलेश मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी बाबाजीच्या विरोधात पाथर्डी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी बाबाजीला ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे पुढील तपास करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!