Disha Shakti

इतर

वडाळा महादेव येथे दोन बिबट्यांचा तरुणावर हल्ला ; दुसरा तरुणही बालंबाल बचावला

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत आत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरात काल रात्री एका तरुणावर चक्क दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये सदर तरुण जखमी झाला असून त्याला शहरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वडाळा महादेव परिसरातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालय रोडवरील शिंदे वस्ती परिसरात राहणारा दीपक एकनाथ शिंदे (वय 32)हा तरुण काल रात्री 8 वाजेच्या सुमारास दूध घालून घरी परतत असताना वस्तीजवळच दोन बिबट्यांनी त्याच्यावर एकाचवेळी हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्याने दीपक शिंदे हा गाडीवरून खाली पडला.

बिबट्याच्या हल्ल्यामध्ये त्याच्या गुडघ्याला व पायाला जखम झाली आहे. अचानकपणे बिबट्याचा हल्ला झाल्याने तरुणाला काय करावे हे समजले नाही. घाबरलेल्या अवस्थेमध्येच त्याने मोठ्याने आरडाओरडा केला. त्याचा आरडाओरडा ऐकून वस्तीवरील नागरिक घटनास्थळी जमा झाले. त्याला तात्काळ श्रीरामपुरातील साखर कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, 20-25 मिनीटांनी नेवासा रोडवरील राऊत वस्ती नजीकच्या वटवृक्ष तसेच दर्गाह जवळील रोड येथे या दोन बिबट्यांनी आणखी एका तरूणावर हल्ला केला. वडाळा महादेव येथील गांगुर्डे नामक तरूण वडाळ्याहून श्रीरामपूरला जात असताना या ठिकाणी मोटारसायकलच्या लाईटमध्ये हे दोन बिबटे त्याला दिसले. पण सावधगिरी बाळगत या तरूणाने आपली मोटारसायकल जोराने दामटली. जवळ येताच या बिबट्यांनी झेप घेण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला.

वडाळा महादेव परिसरामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आहे. अनेक पाळीव प्राणी, शेळी, बोकड या बिबट्याने आपले भक्ष्य केले आहे. आणि आता मोटारसायकलवर चाललेल्या तरुणावर बिबट्यांनी हल्ला केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने परिसरात त्वरीत पिंजरा लावावा, अशी मागणी वडाळा महादेव ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, आणखी एक बिबट्या हरेगाव फाट्यावर पुठ्ठ्याच्या कारखान्याच्या नजीक आणखी एक बिबट्या दिसल्याचे सांगण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!