Disha Shakti

सामाजिक

आज घटस्थापना : आदिशक्तीचा जागर होणार सुरू नवरात्र उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

Spread the love

वसंत रांधवण / विशेष प्रतिनिधी (अहमदनगर) : आदिशक्तीच्या जागराचा, गौरवाचा उत्सव असणार्‍या शारदीय नवरात्रोत्सव आज रविवारी (दि. १५ ) घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. या चैतन्यमयी उत्सवाच्या तयारी जवळपास पूर्ण झाली असून नगरसह राज्यभरातील सर्व देवीची मंदिरे आदिमायेच्या स्वागतासाठी सज्ज होत रोषणाईने सजली आहेत. घरोघरी होणार्‍या घटस्थापनेच्या तयारीसाठी नगरसह राज्यभरातील बाजारातही गर्दी झालेली दिसून आली.

पाथर्डीच्या मोहटा देवी मंदिर, कोल्हारच्या भगवती माता मंदिर, राशिनची रेणूका देवी, निघोजला मळगंगा देवी, ढवळपुरीची दुर्गादेवी या जिल्ह्यातील प्रमुख देवी मंदिरात मोठा उत्सव आयोजित करण्यात येत असून या ठिकाणी नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर व्यवस्थापनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या मंदिरांना रंगरंगोटी आणि आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दहाही दिवस अभिषेक, श्रीसुक्तपठण, जागर-गोंधळ, भजन-कीर्तन आदी पारंपरिक कार्यक्रमांसह सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवात घरोघरी घट बसवले जातात. त्यासाठी आवश्यक असणार्‍या घट, परडी, माती, सप्तधान्ये, ओटीचे साहित्य तसेच पूजा साहित्य आदींच्या खरेदीसाठी स्त्रियांनी बाजारपेठेत गर्दी केली होती. पूजेसाठी आवश्यक असणार्‍या फुलांनाही मोठी मागणी होती.

नवरात्रातील महत्त्वाचे दिवस

१५ ऑक्टोबर- घटस्थापना, १९ ऑक्टोबर – ललिता पंचमी, २१ ऑक्टोबर- महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे),२२ ऑक्टोबर- दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास, २३ ऑक्टोबर- नवरात्रोत्थापना आणि २४ ऑक्टोबर- विजयादशमी (दसरा).

असा आहे मुहूर्त

घटस्थापना यंदा रविवारी (दि. १५) होत असून नवरात्रास प्रारंभ होत आहे. या दिवशी पहाटे पाच पासून दुपारी १.४५ पर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त आहे. या दिवशी चित्रा नक्षत्र वैधृति योगही असला तरी हे कर्म तिथी प्रधान असल्याने या मुहूर्तात घटस्थापना करण्यस हरकत नाही, असे ज्योतिष शास्त्राच्या विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा १९ ऑक्टोबरला ललिता पंचमी असुन २१ ऑक्टोबरला महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. तशी अष्टमी २१ ऑक्टोबरला मध्यरात्री मिळते, त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन आहे. २२ ऑक्टोबरला महाष्टमीचा उपवास करावयाचा असुन २३  ऑक्टोबरला नवरात्रोत्थापन आणि २४ ऑक्टोबरला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला शुभ दिवस दसरा आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!