प्रतिनिधी / कांतीलाल जाडकर : 2019 मध्ये लोकसभेची उमेवारी मी घेतली नव्हती. मात्र मी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुर्णपणे तयार आहे असे प्रतिपादन आमदार राम शिंदे येथे केले.पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र मोहटादेवी मंदिरात आ. प्रा. शिंदे व पारनेरचे आ. निलेश लंके यांनी आरती केली.यावेळी ते बोलत होते. विशेष म्हणजे त्यांचे वाहन आमदार निलेश लंके चालवत होते. त्यावरूनच आमदार शिंदे यांचे लोकसभेच्या रथाचे सारथ्य निलेश लंके यांनी स्वीकारले की काय या राजकीय चर्चेला उधान आले आहे.
श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर आमदार राम शिंदे व त्यांच्या पत्नी आशा शिंदे व आ. लंके यांनी पूजा करून आरती केली. यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते. आ. शिंदे व आ. लंके यांचे देवस्थान समितीचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, अक्षय गोसावी, विठ्ठल कुटे, अनुराधा केदार, डॉ.ज्योती देशमुख, पोपट फुंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भिमराव खाडे यांनी स्वागत करून सन्मान केला.
यावेळी आ. शिंदे म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून मी माझ्या इच्छेवर ठाम आहे.यावर पक्ष आणि नेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे. आ. रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रोवर बोलताना शिंदे म्हणाले, आपली ऐतिहासिक स्थिती पडताळून पाहण्याची गरज आहे. ज्या घराण्याने पन्नास, साठ वर्ष या राज्यातील सत्ता उपभोगली, त्यांनी परत साठ वर्षानंतर युवा संघर्ष यात्रा काढावी लागली हे दुर्दैव आहे.कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधीनी शंभर, दीडशे पीए ठेवले मात्र एकही कर्जत जामखेड मधील ठेवला नाही. इथे युवा संघर्ष दिसला नाही का? असा सवाल शिंदे उपस्थित करत पवार यांच्या संघर्ष युवा यात्रेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे सांगितले.
आमदार लंके म्हणाले, आमदार शिंदे हे पालकमंत्री असताना मला त्यांनी राजकीय जीवनात पक्षाचा विचार न करता फार मदत केली. त्यांच्याविषयी माझ्या मनात वेगळी आस्था आहे. त्यामुळे मी त्यांची गाडी चालवायला बसलो याचा मला आनंद आहे.पुर्वी आम्ही पक्ष बंधने सांभाळून प्रेम जपले आहे. आता आम्ही महायुतीत आल्याने आम्ही एकत्र आलोय एवढेच या निमित्ताने संकेत आहे. कोणाला काय समजायचे तो ज्याचा त्याचा विषय आहे. असे शेवटी लंके म्हणाले.
खा. विखेंविरूद्ध थोपटले दंड
नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात भाजपचेच खा. डॉ. सुजय विखे खासदार तसेच पुढील उमेदवारही आहेत. परंतु भाजपामध्येच 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून एक प्रतिस्पर्धी निवडणुक लढवण्यास तयार आहे. असे खा. डॉ. विखे यांचे नाव घेता शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील खासदारा विरूद्धच दंड थोपटल्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. यात आ. लंके या विखे विरोधकांची साथ मिळाल्याने यास अधिक पुष्टी मिळत आहे.
Leave a reply