अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून पसार झालेला व पसार काळात खून करणारा सराईत गुन्हेगार विश्वजीत रमेश कासार (रा. वाळकी ता. नगर) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेत अटक केली आहे. त्याच्या विरूध्द नगर, पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात 25 गुन्हे दाखल आहेत. विश्वजीत कासार विरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात खून, मोक्का आदी कलमान्वये गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आल्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठातून औषधोपचाराकामी तीन महिन्याचा जामीन घेतला होता.
जामीनाची मुदत संपण्यापूर्वी त्याने सर्वोच्च न्यायालयात मुदत वाढीसाठी आपील केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्याला दोन आठवड्याची मुदत वाढवून देऊन त्यानंतर विशेष न्यायाधीश मोक्का न्यायालय, नगर येथे हजर होण्याबाबत आदेश दिलेले होते. परंतु त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून दोन आठवड्याची मुदत संपल्यानंतर पसार झाला होता.त्या दरम्यान त्याने नाथा ठकाराम लोखंडे (रा. वाळकी ता. नगर) यांचा मारहाण करून खून केला होता.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या अटकेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिले होते.पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव, अंमलदार रवींद्र पांडे, सुरेश माळी, रवींद्र कर्डीले, विजय ठोंबरे, फुरकान शेख, संतोष खैरे, सागर ससाणे, रोहित येमुल, अमोल कोतकर, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांचे पथक काम करत होते. गुप्त बातमी व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे कासार याचे वास्तव्य पुणे येथे असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळताच त्यांनी पुणे येथून त्याला ताब्यात घेत अटक केली आहे.
जामीनावर असताना केले 14 गुन्हे
कासार याच्या विरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 394, 397 सह आर्म अॅक्ट कलमान्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने 10 वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याने या शिक्षेविरोधात अपील दाखल करून जामीन मिळविलेला होता. जामीनावर बाहेर असतांना त्याने तब्बल 14 गुन्हे केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Leave a reply