अकोले प्रतिनिधी / अर्शद शेख : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 26 ऑक्टोबरला शिर्डी दौर्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते निळवंडे प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा होत असून, जलाशय परिसराचे रूपडे पालटले आहे. जिल्हा प्रशासनाने या परिसरात जमावबंदी लागू केली असून, पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. काल पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी निळवंडे धरणावर भेट देऊन पाहणी करून प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी माजी आमदार वैभव पिचड, ज्येष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, सरचिटणीस यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, अमृतसागर दूध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अगस्ती कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र डावरे, बाळासाहेब सावंत, तहसीलदार सतीश थेटे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या रस्त्याने येणार आहेत त्याचे साईड पट्ट्यांवर खडी टाकून डांबरीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे नवीन रोपे खड्डे खोदून लावण्यात आले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौर्यानिमित्त निळवंडे धरण परिसरात सुरू असलेले हेलिपॅडचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. निळवंडे जलाशयावर जाणार्या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. जलाशयालाही रंगरंगोटी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून जलसंपदा विभागाचे अधिकारी येथे तळ ठोकून आहेत.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी धरणातून पाणी सोडण्याची यशस्वी चाचणी घेतली होती. धरणाचे लोकार्पण होत असताना जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान मोदी येथे येणार असल्याने तीन हेलिपॅड तयार करण्याचे काम सुरू आहे. हेलिपॅडला अडथळा येऊ नये, यासाठी विजेचे खांब हटविण्यात येत आहेत. प्रत्येक कामावर प्रशासकीय अधिकारी लक्ष ठेवून आहे.
Leave a reply