Disha Shakti

सामाजिक

“धनगरांनी आता पेटून उठावं, मराठा समाज पाठीशी”; मनोज जरांगे पाटलांचं आव्हान

Spread the love

विशेष प्रतिनिधी / कांतीलाल जाडकर : मराठा आरक्षणाचे संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आज दसऱ्याचे औचित्य साधून अहमदनगरच्या चौंडी येथे धनगर समाजाच्या इशारा मेळाव्यास हजेरी लावली. यावेळी त्यांनी आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही असे म्हणत सरकारला आता एक तासाचा वेळ वाढवून देणार नसल्याचा इशारा दिला आहे.

यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, “धनगर-मराठा समाज लहान-मोठा भाऊ नाही, तर एका रक्तामासांचे आहोत. धनगर समाज बांधवाना घटनेत आरक्षण दिलेले असताना तुम्हाला आरक्षण कसे मिळत नाही, याचं आश्चर्य वाटते. पण आता तुम्हाला सावध व्हावे लागेल, मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील. मला माझ्या जातीशी दगाफटका करता आला असता पण मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. त्यामुळे आरक्षण मिळवण्यासाठी जीवाचं रान करा, लेकरांच्या भल्यासाठी आपल्याला करावे लागणार आहे.

आता धनगर समाज बांधवानो पेटून उठा, मराठा बांधव धनगर समाजाच्या मागे उभा राहील”, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, “डोंगर, दरीत, पाण्यात, पावसात तुम्ही मेंढरं चारता. तुमचं स्वप्न एकच आहे की माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या लेकराच्या वाट्याला नकोत. पण कोणाचंच स्वप्न पूर्ण होत नाही. आरक्षणापायी स्वप्न भंग होतात.

रात्रंदिवस कमावलेला पैसा वाया जातो. आमचा मराठा समाजही उस तोडायचा. रात्री अपरात्री शेतात पाणी द्यायला जायचा. स्वप्न एकच आमच्या वाट्याला जे कष्ट आले ते लेकराच्या वाट्याला येऊ नयेत. म्हणून आरक्षण पाहिजे. म्हणजे आपल्या दोघांचं (मराठा-धनगर) दुखणं एकच आहे. पडलेले सरकार (विरोधक) म्हणतं की मी निवडून आलो की लगेच आरक्षण देतो, मग पडलेले निवडून आले की दुसरे पडलेले म्हणतं की चारच दिवसांत देतो फक्त मोगलाई येऊदे. अरे तुमची सत्ता येते केव्हा? आम्हाला किती दिवस फिरवणार?  ही जागृकता आपल्यात येणे महत्त्वाचे आहे. नुसते भाषणं ठोकून उपयोग नाही”, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “तुमचा व्यवसाय शेती आमचा व्यवसाय शेती. विदर्भातील माणसाला आरक्षण का दिले, असा प्रश्न मी विचारला होता. तेव्हा ते म्हणाले की त्यांचा व्यवसाय शेती आहे. मग मी म्हटलं आमच्याकडे समुद्र आहे का? माळी बांधवांचा व्यवसाय काय आहे? शेती. मग आमचा काय आहे? धनगर बांधवांचा व्यवसाय शेती आहे. तुम्ही (धनगर समाज) घटनेत असून तुम्हाला आरक्षण कसं देत नाहीत? सामान्य धनगर बांधवांना डोकं लावावं लागेल. तुम्ही गप्प बसू नका. तुम्हाला तुमच्या लेकराबाळांचं चांगलं करायचं असेल तर तुम्हालाच पेटून उठावं लागेल. तुम्ही एसटी आहात, घटनेत तुम्हाला आरक्षण द्यायला मिळायला पाहिजे. तुम्ही घर न् घर जागं करा. मी शब्द देत आम्ही ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत”, असा विश्वासही पाटील यांनी धनगर समाजात निर्माण केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!