विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूरच्या विकासाबाबत आम्ही बांधील आहोत. श्रीरामपूर शहराच्या औद्योगिकीकरणासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, जेव्हा याठिकाणी उद्योग येत होते, तेव्हा ते कुणी पळवून लावले हे श्रीरामपूरकर विसरले आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दि. 26 ऑक्टोबरच्या नियोजित शिर्डी दौर्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात आयोजित भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ना. विखे पाटील म्हणाले, श्रीरामपुरात ज्यावेळी उद्योग येत होते. तेव्हा येथे येणारे उद्योग कुणी पळवून लावले. या सर्व गोष्टी श्रीरामपूरकर विसरले आहेत. त्यावेळी येथील अनेकजण सत्तेमध्ये होते. यामागे तालुक्याचे आमदार राहिले त्यांनी येथे उद्योग आणण्यासाठी काय प्रयत्न केले? असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले, त्यांना बाकीचेच उद्योग एवढे होते की, श्रीरामपूरमध्ये उद्योग आणायला त्यांना वेळ नव्हता.
त्यावेळी त्यांच्यावर श्रीरामपूरकरांनी दबाव वाढवला नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. याठिकाणी उद्योग आणण्यासाठी आम्ही बांधील आहोत. औद्योगिकीकरणासाठी आपण वरिष्ठांची बैठकही बोलाविली असल्याचे त्यांनी सांगितले.
तालुक्यातील अकारी पडीत जमिनीचा प्रश्न अनेकांनी भिजत ठेवला आहे. अनेक वर्षांपासून अकारी पडीत शेतकर्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. पहिले जे मंत्री होते त्यांनी या जमिनी मिळू नये म्हणून सरकारच्या बाजूने वकील लावले होते. आपण ते काढून घेतले आहेत. आता येथील आकारी पडीत शेतकर्यांनी काळजी करू नका, तुमचा प्रश्न माझ्याच कार्यकाळामध्ये सुटणार असल्याचे आश्वासन ना. विखे पाटील यांनी यावेळी दिले.रेल्वेच्या नोटिसांमुळे ज्या लोकांना विस्थापित होण्याची भीती आहे. त्या लोकांना विस्थापीत होऊ देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी येथील नागरिकांना दिले.
याप्रसंगी श्रीरामपूर देखरेख संघाचे अध्यक्ष इंद्रनाथ पा. थोरात, भाजपाचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर, माजी सभापती नानासाहेब पवार, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पटारे, जि.प. माजी सदस्य शरद नवले, बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, रामभाऊ तरस, सुनील साठे, गणेश राठी, मारूती बिंगले, गणेश मुदगुले, सुनील वाणी, रवि पाटील, नाना शिंदे, संदीप चव्हाण, नागेश सावंत, विशाल अंभोरे, तिलक डुंगरवाल, डॉ. शंकरराव मुठे, नानासाहेब तनपुरे, विठ्ठल राऊत, अभिषेक खंडागळे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र कांबळे, शरद लिप्टे, मनोज छाजेड, मनोज नवले, केतन खोरे, पुजा चव्हाण, मंजुषा ढोकचौळे माजी नगरसेवक मुख्तार शाह यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा विभाजनाबाबत बोलताना ते म्हणाले, जिल्हा विभाजनाचा कोणताही निर्णय अद्यापही झालेला नाही. ज्यावेळी जिल्हा विभाजनाचा विषय येईल, त्यावेळी सर्वांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला जाईल, परंतु जिल्ह्याच्या प्रश्नावर येथे केवळ भूस पांगविण्याचा प्रकार सुरू असल्याचे ना. विखे यावेळी म्हणाले.
श्रीरामपुरात उद्योग येत होते तेव्हा ते कुणी पळवून लावले, महसूलमंत्री विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना सवाल

0Share
Leave a reply