विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (२६ ऑक्टोबर) शिर्डी दौऱ्यावर असणार आहेत. दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधान शिर्डी येथे पोहोचतील, तेथे ते श्री साईबाबा समाधी मंदिरात पूजा व दर्शन घेतील. यादरम्यान ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनही करणार आहेत. दुपारी २ वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील.
शिर्डीतील नवीन दर्शन रांग संकुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. येथे दहा हजारांहून अधिक भाविकांची आसनक्षमतेची व्यवस्था करण्यात आअली आहे. दर्शनासाठी येणारे भाविक या दर्शन रांग संकुलात थांबतील. यामध्ये क्लॉक रूम, टॉयलेट, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी वातानुकूलित सार्वजनिक सुविधा असतील. या नवीन दर्शन क्यू कॉम्प्लेक्सची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर 2018 मध्ये करण्यात आली होती.
आपल्या दौऱ्यादरम्यान, पंतप्रधान निळवंडे धरणाचे जलपूजन करतील आणि त्याच्या डाव्या काठाच्या कालव्याचे लोकार्पण करतील. पंतप्रधान निळवंडे धरणाच्या डाव्या बाजूच्या (८५किमी) कालव्याचे लोकार्पण करतील. याचा लाभ ७ तालुक्यांतील १८२ गावांना (अहमदनगर जिल्ह्यातील ६ आणि नाशिक जिल्ह्यातील १) पाणी पाईप वितरण नेटवर्कच्या सुविधेसह होणार आहे. निळवंडे धरणाची कल्पना सर्वप्रथम १९७० मध्ये मांडण्यात आली होती. सुमारे ५१७७ कोटी रुपये खर्चून ते विकसित केले जात आहे.
पंतप्रधान ‘नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना’ लाँच करतील ज्याचा लाभ ८६ लाखांहून अधिक शेतकरी लाभार्थ्यांना होणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील ८६ लाखाहून अधिक लाभार्थ्यांना प्रति वर्ष ६००० रुपयांची अतिरिक्त रक्कम उपलब्ध करून दिली जाईल. दुपारी ३:१५ च्या सुमारास, पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आरोग्य, रेल्वे, रस्ते यासारख्या क्षेत्रातील सुमारे ७५०० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे.
पंतप्रधान अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि त्याचे लोकार्पण करतील. अहमदनगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माता व बाल आरोग्य विभागाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड आणि मालकी कार्डचे वाटप करतील.
Leave a reply