Disha Shakti

राजकीय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यांमुळे नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक वळवली

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / युनूस शेख : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (गुरूवारी) शिर्डी दौर्‍यावर असून त्यांच्या वाहन ताफ्यास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून आज सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याबाबत आदेश काढले आहेत. मनमाड महामार्ग हा साई मंदिरासमोरून जात असून या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतुक सुरू असते. सदर वाहतुकीमुळे पंतप्रधान मोदी यांच्या वाहन ताफ्यास अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमासाठी जाणार्‍या वाहनांस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होऊ शकते. यामुळे मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक 10 तासांसाठी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याचे अधीक्षक ओला यांनी आदेशात म्हटले आहे.

नगरकडून शिर्डी-मनमाड कडे जाणारी सर्व प्रकारची जड वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. केडगाव बायपास-विळद घाट चौक-दूध डेअरी चौक-शेंडी बायपास-नेवासा-गंगापूर-वैजापूर-कोपरगाव मार्गे मनमाडकडे जातील. मनमाड, कोपरगावकडून येणारी वाहने पुणतांबा चौफुली-झगडे फाटा-पोहेगाव-तळेगाव कोल्हार मार्गे नगरकडे येतील. तसेच छत्रपती संभाजीनगरकडून विळद घाट मार्गे पुण्याकडे जाणार्‍या वाहनांकरीता शेंडी बायपास-एसपीओ चौक-चांदणी चौक-वाळुंज बायपास-अरणगाव बायपास-केडगाव बायपास मार्गे पुणे या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!