Disha Shakti

सामाजिक

यंदा मान्सून रुसला, मेंढपाळ बांधवांसाठी दिवाळी कडू होणार

Spread the love

सातारा प्रतिनिधी / विकास पडळकर : दिनांक 26/10/2023 या वर्षात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात मेंढपाळ बांधव चाऱ्याच्या शोधार्थ लवकरच कोकणाकडे स्थलांतरित होणार आहेत.जूनपासून चातकाप्रमाणे आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांनाच यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा बरोबरच, पशुपालन व्यवसायही मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडला आहे.

महाराष्ट्राच्या पठारावरील सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यातील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या तालुक्यात पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय संकटात आलेले आहेत, त्याचाच सर्वात जास्त फटका मेंढपाळ व्यवसायाला बसलेला दिसून येत आहे. मेंढपाळाच्या तोंडावरील आनंद मावळलेला आहे .त्याला अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे , दरवर्षी मेंढपाळ बांधव दिवाळी सण मोठ्या धामधुमीत साजरा करून कोकणाकडे स्थलांतरित होतात, परंतु सध्या मेंढ्यांच्या चाऱ्याचा, पाण्याचा प्रश्न बिकट झाल्याने अनेक मेंढपाळ व्यावसायिक स्थलांतर करण्याच्या मानसिकतेत आहेत.

गोरगरीब मेंढपाळ बांधवांच्या मुलांना यावर्षी दिवाळी साजरी करता येणार नाही, त्यांच्या तोंडातील घास यावर्षी निसर्गाने हिरावून घेतला आहे ,जरी दिवाळी तोंडावर आली असली तरी हा सण साजरा न करताच लोक आपल्या जीवापाड सांभाळलेल्या प्राण्यांच्या चाऱ्याच्या शोधात कोकणाच्या वाटेवर जाण्यासाठी तयारीला लागले आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!