प्रतिनिधी / इनायत अत्तार : शहरातील प्रथीतयश डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे यांच्या घरी जबरी चोरी झाल्याची घटना काल पहाटे घडली. तीन अज्ञात चोरट्यांनी डॉ. ब्रम्हे यांना बांधून ठेवून त्यांच्या साक्षीने त्यांच्याकडील तब्बल 40 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्यांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी भेट देऊन अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुंजे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळाची पहाणी केली.
शहरातील वॉर्ड नं. 7 मधील काळाराम मंदिर शेजारी ब्रह्मे हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलच्या वरती डॉ. प्रफुल्ल हे राहतात. डॉक्टरांच्या पत्नी आणि मुलगी या कर्नाटक परिसरातील धारवाड येथे माहेरी गेलेल्या आहेत. तसेच त्यांचा मुलगा चिन्मय हा देखील कॉन्फरन्ससाठी बाहेरगावी गेलेला होता. काल पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा चिन्मय हा बाहेरगावाहून आला. चिन्मय हेही डोळ्याचे डॉक्टर असून ते नगर येथील कांकरिया हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात. पहाटे आल्यानंतर ते झोपी गेले. साधारण साडेचार ते पाच वाजेच्या दरम्यान तीन चोरट्यांनी लोखंडी शिडी डॉक्टरच्या हॉस्पिटलच्या पुढच्या बाजूला लावली. वर चढताना अगोदर हॉस्पिटलच्या दरवाजालाही बाहेरून कडी लावली. शिडीवरून तिघे चोर वर गेले.
त्यानंतर कटरच्या साह्याने त्यांनी जाळी तोडून घराचा कडी कोयंडा तोडला आणि आत प्रवेश केला. अगोदर चोरट्यांनी डॉ. चिन्मय ब्रम्हे यांच्या रुमचा दरवाजा बाहेरुन बंद केला. आणि हे तिघे चोर डॉ. प्रफुल्ल ब्रम्हे झोपलेल्या ठिकाणी गेले. त्यांनी डॉ. प्रफुल्ल ब्रह्मे यांचे तोंड हाताने दाबले. दोन जणांनी लगेच त्यांचे हातपाय बांधले. त्यामुळे डॉ. ब्रह्मे हे गप्प बसले. हातपाय बांधून खिडकीला डॉक्टरांचे पाय वर लटकवले. नंतर चोरटे थेट ज्या कपाटात कॅश ठेवली, त्या कपाटाजवळ गेले. त्यांनी कटवणीच्या साह्याने ते उघडले. आणि कपाटातील कॅश एका बॅगेत भरली.
साधारण वीस मिनिटांच्या आत हा सगळा प्रकार झाला. कॅश घेऊन तिघे चोरटे आल्या मार्गे पसार झाले. चोरटे गेल्यानंतर डॉक्टरांनी कशीबशी आपली सुटका करत, आपल्या मित्रांना फोन लावला. चोरटे गेल्यानंतर त्यांनी कपाटातील कॅश तपासली असता 100, 200 व 500 रुपयाच्या नोटा मिळून अशी एकूण 40 लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
डॉ. प्रफुल ब्रह्मे मुलाच्या रूम जवळ गेले. रूम बाहेरून लावलेली असल्याने रूम उघडून त्यांनी मुलास जागे केले व घडलेला प्रकार सांगितला. त्यांचे मित्र आल्यानंतर त्यांनी घडलेली घटना श्रीरामपूर पोलीसांना सांगितली. सकाळी सहा वाजता घटनास्थळी पोलीस दाखल झाले. मुलगा नेत्र रोग तज्ञ असल्याने त्यासाठी मशिनरी घ्यायच्या होत्या, त्यामुळे सदर कॅश ही घरात ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले. घटनास्थळी नगर येथून श्वान पथक बोलवण्यात आले होते. या धाडसी चोरीमुळे श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात डॉ. प्रफुल्ल बाळकृष्ण ब्रम्हे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम 392, 457, 458, 380, 342, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.
Leave a reply