विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने काल सायंकाळी शहरातील हनुमान मंदिर, रेल्वे स्टेशन, श्रीरामपूर येथून कॅन्डल मार्च काढण्यात आला होता. यामध्ये माता भगिनींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढाई पुन्हा सुरू केली आहे. जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून श्रीरामपूर शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज आरक्षणाच्या लढाईत उतरले आहे. पहिल्या टप्प्यात श्रीरामपूर शहर बंद यशस्वीपणे करण्यात आले. दुसर्या टप्प्यात शहरातील प्रशासकीय भवन तसेच गावोगावी साखळी उपोषण करत मराठा समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात आपला लढा तीव्र केला आहे. याच पार्श्वभुमीवर श्रीरामपुरातील सकल मराठा समाजाने काल सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला.
यामध्ये शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातून मराठा समाज सहभागी झाला होता. या कॅन्डल मार्चचे शहरातील विविध ठिकाणी समर्थ ग्रुप, आम आदमी पार्टी, सकल सिंधी पंजाबी समाज, परिवर्तन समिती, श्रीराम तरुण मंडळ, जागृती मित्रमंडळ, श्रीराम सेवा संघ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, व्यापारी असोसिएशन, भगतसिंग चौक मित्रमंडळ, छत्रपती राजे संभाजी मित्र मंडळ, बार असोसिएशन, सकल जैन समाज, मुस्लिम समाज, जिजामाता तरुण मंडळ, शिवप्रतिष्ठान, जय भवानी मित्रमंडळ तसेच सर्वपक्षीयांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
या कॅन्डल मार्चची सुरुवात रेल्वेस्टेशन जवळील हनुमान मंदिर येथून होऊन मेनरोड, बेलापूर रोड कॅनॉल पूल, छत्रपती संभाजी राजे चौकमार्गे, छत्रपती शिवाजी महाराज रोड येथे नगरपालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून गांधी पुतळा येथे समारोप करण्यात आला. यावेळी लहान मुले, विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक-युवतींसह महिला-पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शहरातील चिमुकली रिया भोसले हिने आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.
Leave a reply