जिल्हा प्रतिनिधी / युनूस शेख : डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना हा सभासद, कामगारांच्या व शेतकर्यांच्या मालकीचा राहिला पाहिजे. त्यासाठी बँकेने कारखाना भाडेतत्त्वावर न देता प्रत्येक गाळप हंगामात साखर पोत्याच्या टॅगिंगनुसार 20 वर्षांचे हप्ते पाडून कर्जवसुली करावी आणि निवडणुकीनंतर याबाबतचा अधिकार संचालक मंडळाला असावा, अशी मागणी राहुरी कारखाना बचाव कृती समितीने बँकेच्या कार्यकारी संचालकांकडे केली आहे.
कार्यकारी संचालकांना ई-मेलवर दिलेल्या अर्जात म्हटले आहे, जिल्हा बँकेचे कारखान्याकडे कर्ज आहे. कारखान्याची कोट्यवधीची मालमत्ता बँकेने जप्त केली आहे. कारखान्याच्या जमिनीवर आपण बँकेचा रीतसर बोजा चढविला आहे. सध्या कारखाना कार्यक्षेत्रात प्रचंड ऊस आहे. बँकेने कर्जवसुलीसाठी प्रत्येक हंगामाला साखर पोत्याच्या टॅगिंगनुसार आपल्या नियमानुसार कर्जास 20 वर्षांचे हप्ते पाडून देऊन कर्जवसुली करण्यात यावी. तसेच कारखान्याची निवडणूक झाल्यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा अधिकार संचालक मंडळाला देण्यात यावा.
सध्या कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी अमृत धुमाळ, राजू शेटे, पंढरीनाथ पवार, दिलीप इंगळे, अरुण कडू, कोंडापाटील विटनोर, संजय पोटे, दत्तात्रय जाधव आदींनी केली आहे.
Leave a reply