नेवासा प्रतिनिधी / अंबादास काळे : मुळा धरणात पाणी नसताना मराठवाड्याला पाणी सोडण्याचा निर्णय अन्यायकारक असून या विरोधात आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी घोडेगाव येथे रास्ता रोको केला. मराठवाड्यसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. जर पाणी सोडायचे असेल तर निळवंडेचे पाणी सोडावे व नेवासा तालुक्यातील नदीवरचे बंधारे भरून द्यावे या मागणीसाठी रस्ता रोको करण्यात आला.कारभारी जावळे यांनी प्रास्तविकामध्ये सर्व मुद्दे मांडले. याप्रसंगी अण्णासाहेब पटारे, बाळासाहेब सोनावणे, अशोकराव येळवंडे, मच्छिंद्र म्हस्के, योगेश होंडे, संजय नागोडे, अशोकराव गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी आमदार शंकरराव गडाख यांनी भाषणाच्या सुरवातीला मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्र पेटला आहे. सरकारने चांगला निर्णय घ्यावा यासाठी मराठा समाज सरकारकडे डोळे लावून बसला आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रातील लाभधारक शेतकरी अडचणीत आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळने अन्याययाकारक निर्णय घेतला आहे. एक तर पाणी सोडू नका जर तुम्हाला खाली पाणी सोडायचे असेल तर निळवंडे धरणातून पाणी सोडा. कारण निळवंडेच्या कालव्याची कामे पूर्ण झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे निळवंडेच्या पाण्याचे करायचे काय असा प्रश्न असताना मुळाचे पाणी सोडण्याचा अट्टहास का केला जात आहे? निळवंडेचे पाणी खाली सोडा व नेवासा तालुक्यातील सर्व केटीवेअर भरून द्या अशी आमची मागणी आहे.
निळवंडेचे पाण्याला जिल्ह्यातील उत्तरेतील मोठ्या नेत्यांचा विरोध होऊ शकतो. त्यांनी मोठे मन करावे. पुढाकार घ्यावा अन्यथा आम्ही शांत बसणार नाही. समन्यायी कायद्याचा फेरविचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. तालुक्याच्या हक्काच्या पाण्यासाठी कितीही मोठा त्याग करायची वेळ आली तरी मागे हटणार नाही. वेळोवेळी संघर्ष करत राहू. मुळाच्या पाण्याचे भविष्यात दोन रोटेशन करण्यासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे आ.गडाख म्हणाले. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी आभार मानले व आ.शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली पाण्यासाठी लढा कायमस्वरूपी तेवत ठेवण्यासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले.जायकवाडीतील मृतसाठ्यातून 6 टीएमसी काढले तर पाणी थांबविता येईल?
गडाख हे पाटपाण्याचे ‘जरांगे’
गेल्या अनेक वर्षांपासून आ. शंकरराव गडाख हे पाटपाण्यासाठी आंदोलन करत आहे त्यासाठी ते धरणावर गेले, तुरुंगात पण गेले आहे व त्यांनी तालुक्यासाठी पाणी आणून दाखविले हे सर्व राज्याने पहिले आहे ज्या प्रमाणे मराठा आरक्षणासाठी जरांगे आंदोलन करत आहे तशाच प्रकारे आ. गडाख हे पाटपाण्यासाठी ‘जरांगे’ आहेत असे संजय नागोडे यांनी जाहीर भाषणात सांगताच उपास्थीतांनी टाळ्यांचा कडकडाट केला.सोलापूरचे उजनी धरण कोरडेठाक पडले आहे पण तेथे पुणे जिल्ह्याच्या धरणातून पाणी सोडले जात नाही. समन्यायी कायदा हा राज्यासाठी असताना देखील त्याची अंमलबजावणी ही फक्त नगर जिल्ह्यापुरतीच का केली जाते? असा सवाल आ. गडाख यांनी यावेळी उपस्थित केला.
Leave a reply