Disha Shakti

इतर

गुहा येथील धार्मिक वाद प्रकरणी टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांचा तहसीलवर निषेध मोर्चा

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक वाद प्रकरणात झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी हजारो वारकरी व गुहा तसेच पंचक्रोशीतील कानिफनाथ भक्त या मोर्चात मोठ्या संख्यांने सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथ भक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले होते.

गुहा येथील धार्मिक ठिकाणी दोन समाजात यापूर्वीही धार्मिक विधीवरून वाद टोकाला गेले आहेत. काही दिवसांपूर्वी याच पद्धतीने दोन्ही बाजूने वाद होत धार्मिक स्थळावर, तसेच गावात मोठ्या हाणामाऱ्या झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

या प्रकरणी कानिफनाथ मंदिरात दैनंदिन पूजा करणाऱ्या पूजाऱ्यांवर व भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज वारकरी व गुहा तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढला. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथ भक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले. त्यानंतर अतिशय निघालेला मोर्चा नगर-मनमाड मार्ग, शहरातील मुख्य पेठ मार्गे राहुरी तहसीलवर धडकला.

यावेळी रामकृष्ण हरी, कानिफनाथ महाराज की जय आदी जयघोष करण्यात आला. या मोर्चात महंत उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर, अर्जुन महाराज तनपुरे, आदिनाथ महाराज दुशिंग, किशोर महाराज जाधव , संजय महाराज शेटे, भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, श्रीकांत महाराज गागरे, नवनाथ महाराज आहेर, सुजित महाराज कदम, प्रमिला महाराज कोळसे आदींसह संत महंत व टाकळरी, वारकरी व नाथ भक्त सहभागी झाले होते.

यावेळी उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर, किशोर महाराज जाधव, अजय मांजरे, संपत महाराज जाधव, प्रा.एफ. झेड देशमुख यांनी आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या. वारकरी व नाथभक्त यांच्या मोर्चास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह शेकडो पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

तहसील कचेरीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. वारकरी,  नाथभक्त व गुहा ग्रामस्थ यांनी वारकऱ्यांवर व पूजाऱ्यांवर हल्ला करण्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलिस प्रशासनाने स्वीकारले. पसायदानाने या मोर्चाची सांगता झाली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!