Disha Shakti

इतर

रिपाइं’चे राहुरी पालिकेला डासांबाबत निवेदन

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : यंदा पाऊस नसल्याकारणाने दिवसेंदिवस वातावरण प्रदूषणयुक्त होत आहे. त्यात राहुरीकर मोठ्या अभिमानाने “स्वच्छ राहुरी, सुंदर राहुरी” हा नारा मनातल्या मनात का होईना देत असतात. परंतु सध्या राहुरीत घाणीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झालेले आहे.

घाणीच्या साम्राज्यामुळे शहरात डासांचे व पर्यायाने अनेक रोगांचे आगमन झाले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखणे, स्वच्छता राखणे, मुताऱ्या स्वच्छ ठेवणे याबाबत रिपाइं आठवले गटाचे शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे यांनी त्यासंदर्भात राहुरी नगरपरिषदेला निवेदन दिले आहे. राहुरी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी बडावकर साहेबांनी त्या निवेदनाचा स्वीकार केला.
शहरात डासांच्या प्रादुर्भावामुळे लहान मुले, वृद्ध निरनिराळ्या आजारांनी त्रस्त झाले आहेत. ताप, हिवताप, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजाराने शहरात शिरकाव केला आहे. त्या आजारांना अनेक नागरिक बळी पडत असून राजकीय पुढारी व पालिकेचे प्रशासन त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

पालिका प्रशासनाने नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन लवकरात- लवकर डास विरोधक फवारणी संपूर्ण शहरात करावी, व स्वच्छता प्रत्येक वार्डात होईल, मुताऱ्या, शौचालयांची स्वच्छता याबाबत नियोजन करावे, अन्यथा रिपाइं तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाइं शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनुसंगम शिंदे यांनी दिला आहे.

निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, राहुरी तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे, राहुरी तालुका उपाध्यक्ष सुनील चांदणे, सागर साळवे, रवींद्र शिरसाठ,नविन साळवे,धनंजय पुरोहित, प्रविण पुरोहित, हर्षल लगे,उत्तम आहेर सौ.छाया शिंदे, सौ.रेखा सांगळे,संतोष दाभाडे, राजू दाभाडे, विवेक सगळगिळे, अतुल त्रिभुवन, राजू बागुल,मयूर सुर्यवंशी, नंदू सांगळे आदींच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार प्राजक्त तनपुरे, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, राहुरी आदींना पाठविण्यात आल्या आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!