विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : भंडारदरा व निळवंडे धरणातून पैठण धरणामध्ये प्रवरा नदीतून सांडव्याद्वारे पाणी सोडण्यात येणार आहे. यादरम्यान प्रवरा नदीवरील राहुरी तालुक्यातील रामपूर, केसापूर या कोल्हापुर बंधारा तर श्रीरामपूर तालुक्यातील मांडवे, गळनिंब, वळदगाव, पढेगाव, मालुंजा, भेर्डापूर, वांगी, खानापूर व कमलापूर या कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश जारी करण्यात आले आहेत.
श्रीरामपूरचे उपविभागीय दंडाधिकारी किरण सावंत पाटील यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (3) अन्वये प्रतिबंधात्मक स्वरूपात 4 डिसेंबरपर्यंत जमावबंदी आदेश जारी केले आहेत. पैठण धरणामध्ये सोडलेले पाणी सुरळीतपणे जाण्यासाठी फळया (बर्गे) काढण्यात येणार आहेत. नदीपात्रामध्ये पाणी सोडल्यानंतर काही ठिकाणी कोल्हापूर पध्दतीच्या बंधार्यात शेतकरी बर्गे टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. तसेच प्रवाह कालावधीत लाभधारकांकडून अनिधकृत पाणी उपसा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यासाठी नेमलेल्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्यांना दमदाटी मारहाण होवून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.
प्रतिबंधात्मक (जमावबंदी) आदेश लागलेल्या ठिकाणांवर कोणीही गर्दी करु नये, म्हणून या ठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे व या परिसरात प्रवाह कालावधीत पाच किंवा अधिक व्यक्तीस एकत्र येण्यास मनाई राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तीच्या हालचालीवर फिरण्यावर या कालावधीत निर्बंध राहील. या कालावधीत या ठिकाणांच्या आजुबाजूस 500 मीटरपर्यंतचे परिसरात कार्यकारी अभियंता, नगर पाटबंधारे विभाग अंतर्गत नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी व वाहने यांना वगळता कोणालाही प्रवेश करता येणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
जायकवाडीला पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू ; राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हापूर बंधारा परिसरात जमावबंदी आदेश

0Share
Leave a reply