Disha Shakti

इतर

पोलिसांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्नात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी पिकअप विहिरीत कोसळली

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / युनूस शेख  : वाळूची बेकादेशीर वाहतूक करणारी पिकअप खोल विहिरीत कोसळल्याची घटना काल मध्यरात्री तालुक्यातील धांदरफळ परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये वाळू वाहतूक करणारे तीन मजूर विहिरीतून बाहेर येण्यास यशस्वी ठरल्याने ते बचावले असून वाहन चालकाचा मात्र विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.

विहिरीत खोलवर पाणी असल्याने ही पिकअप बाहेरून दिसेनाशी झाल्याने तपासासाठी गेलेले पोलीस हात हलवीत परत आले. पोलिसांनी केलेला पाठलाग चुकवण्याच्या नादात पिकअप शेतातील एका विहिरीत पडल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. याबाबत समजलेले अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे.

तालुक्यातील पश्चिमेकडील गावांमधून खुलेआम वाळूचा बेकायदेशीर उपसा केला जात आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेकायदेशीर वाळू उपसा बाबत कठोर भूमिका घेऊनही संगमनेर तालुक्यातील बेकायदेशीर वाळू उपसा खुलेआम सुरूच आहे. काल रात्री धांदरफळ परिसरातील प्रवरा नदी पात्रातून वाळू उपसा करून वाळूने भरलेली पिकअप ही धांदरफळच्या दिशेने खाली होऊन येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी या पिकअपचा पाठलाग सुरु केला. पोलीस आपला पाठलाग करत असल्याचे पिकअप चालक गोरख नाथा खेमनर (वय 23, राहणार डिग्रस, ता. संगमनेर) याच्या लक्षात आले. पोलिसांचा पाठलाग चुकवण्यासाठी त्याने भरधाव वेगाने वाहन चालवले. पुढे गेल्यानंतर त्याने आपले वाहन एका शेतात घातले. मध्यरात्री पिकअप चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा आपल्या वाहनावरील ताबा सुटला. वाळूची रिकामी पिकअप थेट रस्त्यालगत असणार्‍या शेतातील एका खोल विहिरीत कोसळली. या वाहनांमध्ये चालकासह तीन मजूर बसलेले होते. वाळूची रिकामी पिकअप विहिरीत कोसळली. तिन मजुरांनी दोरीच्या साह्याने विहिरीच्या बाहेर येत आपला जीव वाचवला. मात्र पिकअप चालक गोरख खेमनर हा पिकअपसह विहिरीमध्ये बुडाला. विहिरीच्या पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान याबाबत स्थानिक ग्रामस्थांना माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. काही ग्रामस्थांनी या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. ही माहिती समजताच तालुका पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली. ज्या विहिरीमध्ये पिकअप पडली आहे ती विहीर अतिशय खोल असून पूर्ण पाण्याने भरलेले आहे. वाळूची रिकामी गाडी विहिरीच्या तळापर्यंत पोहोचल्याने पोलिसांना हे वाहन दिसू शकले नाही. यामुळे पोलिसांना हात हलवत परत जाण्याची वेळ आली. पोलीस सकाळी पुन्हा घटनास्थळी गेले. या ठिकाणी पोलिसांनी क्रेनला व काही पोहणार्‍या युवकांना पाचारण केले. विहिरीत पाणी भरपूर असल्याने पिकअप चालकाचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.

संगमनेर तालुक्यातील वाळू तस्करी बाबत महसूलमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतलेली आहे. महसूल कर्मचार्‍यांचे पथक रात्री ठिक ठिकाणी फिरत असते असे असतानाही तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळूचा सुरूच आहे. या बेकायदेशीर वाळू उपशाला महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याने महसूल मंत्री आता या कर्मचार्‍यांवर कोणती कारवाई करतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

पिकअप ला लाईट नसल्यामुळे घटना घडली?

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ परिसरात वाळूचे वाहन विहिरीत कोसळल्याने उलट सुलट चर्चा सुरू आहे. वाळूची वाहतूक करणार्‍याला वाहनाला लाईटच नव्हती, यामुळे हे वाहन विहिरीत कोसळले असावे अशी चर्चा सुरू आहे. तालुक्यात वाळूची वाहतूक करणारे अनेक वाहने बेकायदेशीर आहे. काही वाहनांना कागदपत्रेही नाही. असे असतानाही वाळू वाहतूक करणारे चालक बेदरकारपणे वाळूची वाहतूक करत आहे. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!