Disha Shakti

राजकीय

विवेक कोल्हे संतापले, हे पाणी पिण्यासाठी नव्हे तर शेतीच्या सिंचनासाठी हे तर दुर्दैव…

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : जायकवाडी धरणामध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा हा पिण्यासाठी पुरेसा आहे. मात्र, नगर जिल्ह्यामध्ये सिंचनाचे काय? पिण्याच्या पाण्याचीही नगर जिल्ह्याची अवस्था वाईट होऊ शकते. मात्र, नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील नेतृत्व आपल्या मागणीत कुठे कमी पडलं आणि यामुळे मराठवाड्यातील शेतीसाठी नगर जिल्ह्यातील पिण्याचे पाणी सोडण्याची वेळ आली आहे, हे दुर्दैव आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिली.

मराठवाड्याला पाणी सोडण्याबद्दल कोणताही विरोध नाही. मात्र, सद्यः स्थितीमध्ये जायकवाडी धरणात 58 टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा मराठवाड्याच्या जनतेला पिण्यासाठी पुरेसा आहे. मात्र, त्यात शेतीच्या सिंचनासाठी नगर आणि नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडणे, हे कितपत योग्य आहे?

नगर जिल्ह्यामध्ये कमी पावसामुळे अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी आसुसले आहेत. अशात भविष्यात पिण्यासाठी पाणी शिल्लक राहिले नाही तर काय करणार, असं म्हणत पाणी सोडण्याची घाई, ही गोष्ट दुर्दैवी असल्याचं मत कोल्हे यांनी व्यक्त केले.नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येत जायकवाडीसाठी पाणी न सोडण्याचा ठराव राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.

नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून हा ठराव सरकारकडे गेला आहे. यापूर्वी कधीही असं घडलं नाही, आता नवीन पद्धत सुरू होतेय नगर जिल्ह्यात पाणी सोडण्यासाठी विरोध करणाऱ्या याचिका एकत्रित लढवल्या जाव्यात आणि त्यासाठी एकच वकील नेमला जावा, असे ठरविण्यात आलं होतं. मात्र, याबद्दल नगर जिल्ह्यातून कोणतीही हालचाल झाल्याचे दिसून येत नाही. म्हणून आम्ही कपिल सिब्बल यांना आमच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नेमलेले आहे, असं विवेक कोल्हे यांनी सांगितलं.

कोल्हे यांच्या म्हणण्यानुसार कुठेतरी एकत्रित प्रयत्न नगर जिल्ह्यातून कमी पडत आहेत. दबाव कमी पडत आहे आणि त्यामुळेच आपल्या नगर जिल्ह्यातील हक्काचे पाणी जायकवाडीला जात असल्याचे विवेक कोल्हे यांनी सूचित केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!