राहुरी प्रतिनिधी / नाना जोशी : राहुरी तालुक्यातील मुळा धराणातून जायकवाडीसाठी 4 हजार क्युसेकने पाणी झेपावले असून पाणी सोडण्याबाबत फक्त समाज माध्यमांवर विरोध होत असताना प्रत्यक्षात धरणाकडे कोणीही फिरकला नसल्याने धरणाच्या 11 दरवाजांतून विना अडथळा जायकवाडीच्या दिशेने विसर्ग वाहता झाला आहे.
काल समाज माध्यमावर पाटबंधारे विभागाकडून दुपारी 12 वाजता मुळा धरणातून पाणी सोडण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच धरणावर सायरनही वाजविण्यात आलेे होते. राहुरी नगरपरिषद व मुळानदी काठच्या गावातील ध्वनीक्षेपकावरून दवंडी सुध्दा देण्यात आली होती. मात्र, पाटबंधारे विभागाच्या आधिकार्यांना 3 वाजेपर्यंत पाणी न सोडण्याचे वरिष्ठांचे आदेश आल्याने मराठवाडा, नगर व नाशिकच्या पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांची फेर नियोजनाबाबत बैठक झाल्याचे समजते. त्यानंतर दुपारी 3 वाजता पुन्हा सायरन देऊन मुळा धरणाच्या 11 दरवाजांतून नदी पात्रात 4 हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले. त्यानंतर रात्री 9 वाजता खालील परिस्थितीचा आढावा घेऊन विसर्ग वाढवून टप्प्याटप्प्याने 8 हजार क्युसेक करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून समजते.
दरम्यान, पाणी सोडण्यापुर्वी मुळानदीवरील डिग्रस, मानोरी, मांजरी व वांजूळपोई या बंधार्यांच्या फळ्या काढण्यात आल्या होत्या. काल मुळाधराणावर सकाळीच मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सायली पाटील, उपअभियंता विलास पाटील, शाखाअभियंता राजेंद्र पारखे, सहाय्यक सलीम शेख, सुनिल हरिश्चंद्रे, कर्मचारी अयुब शेख, जायकवाडी धरणाचे उपअभियंता गोकुळे यांसह दोन शाखाअभियंता, कालवा निरीक्षक दिनकर लातपटे, बी.एम. टेकूळे, संदीप अंभोरे, एम.वाय.पुंड तसेच दोन पोलीस कमचारी आदींच्या उपस्थितीत पाणी सोडण्यासाठी हलचाली सुरू झाल्या होत्या. 26 हजार दलघफू क्षमता असलेल्या मुळा धरणामध्ये 22 हजार 806 दलघफू पाणीसाठा असून त्यापैकी 2 हजार 100 दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने रवाना होणार आहे.
राजकीय अथवा सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाणी सोडण्यास अडथळा निर्माण होईल, असे बोलले जात असताना कोणताही राजकीय नेता अथवा सामाजिक कार्यकर्ता धरणकडे फिरकला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाला पाणी सोडताना कोणताही अडथळा निर्माण झाला नाही.
सिंचनासाठी एक उन्हाळी आवर्तन कमी होण्याची शक्यता
मुळा धरणातून सिंचनासाठी खरीप, रब्बी, तसेच उन्हाळी आवर्तन सोडले जाते. परंतु, या वर्षी जायकवाडीसाठी मुळाधरणातून 2.10 टीएमसी पाणी सोडण्यात आल्याने यंदा एक उन्हाळी आवर्तनाची कपात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच इतरही आवर्तन सुरू ठेवण्याचा कालावधी घटणार आहे.
Leave a reply