Disha Shakti

कृषी विषयी

गारपीट आणि अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करा- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Spread the love

विशेष प्रतिनिधी /  इनायत अत्तार : गारपीट आणि अवकाळी पावसाने नूकसान झालेल्या सर्व पीकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले असून,तांत्रिक कारणासाठी पंचनामे थांबवू नका,चारा उत्पादनासाठी नियोजन करा  अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मदत करण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही  अशी ग्वाहीही त्यांनी पहाणी दौऱ्याच्या निमिताने दिली.

महसूलमंत्री तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी पारनेर तालूक्यतील गांजीभोयरे येथील एकनाथ खोदडे यांच्या नूकसान झालेल्या कांदा पीकाची पाहाणी केली.गारपीटीने नूकसान झालेल्या महादू बापुराव आढाव यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या बागेची पाहाणी करुन माहिती घेतली. ड्रॅगन फ्रुटची बाग आता पूर्णपणे गेली असून ती उभारणीसाठी पुन्हा दोन ते अडीच लाख रुपये लागणार असल्याची कैफीयत त्यांनी मंत्र्यापुढे मांडली.त्यांच्याच काढणीला आलेल्या द्राक्ष बागेच्या नूकसानीची माहिती घेवून मदतीबाबत मंत्र्यांनी त्यांना आश्वासित केले.

झालेल्या नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. शेतकरी महिला यांनी सांगितलेल्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने जनावारांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट झाला असल्याचे महिलांनी निदर्शनास आणून त्यांनी जिल्हाधिकारी तसेच अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

अवकाळी पाऊस तसेच गारपीटीने सर्वाधिक नूकसान झालेल्या भागाची पहाणी करीत असलो तरी इतरही तालुक्यात नूकसान झालेल्या पीकांचे शंभर टक्के पंचनामे करण्यास सुरूवात झाली आहे. तांत्रिक कारणाने पंचनामे थांबणार नाहीत.या पंचनाम्याच्या अहवालानंतरच मदतीबाबत शासन निर्णय करेल असे सांगून पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की,यापुर्वी सुध्दा सरकारने अशा नैसर्गिक संकटात सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदतीची केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्षात निर्णयाची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका बजावली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

या संकटात सुध्दा एनडीआरएफच्या निकषाप्रमाणेच शासन मदत करण्याबाबत सकारात्मक असून दोन हेक्टरची अट शिथिल करून तीन हेक्टरपर्यत मदत करण्याबाबत शासनाचा निर्णय झाला आहे. राज्यातील नूकसानीची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर मदतीबाबत निर्णय होईल, असेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
झालेले नूकसान भरून येवू शकत नाही,पण या आपतीमध्ये चाऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेवून पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्यावतीने चारा उपलब्ध करून देण्यात आला असून यामध्ये अधिकची वाढ करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी सांगितले.

चारा उत्पादनासाठी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने यापुर्वी घेतला असून जिल्ह्यात चारा उत्पादनासाठी पशुसंवर्धन विभागाने नियोजन करून आराखडा तयार करावा. तसेच मूरघास उत्पादन होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मविभूषण अण्णा हजारे यांचीही राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. उपाय योजनाबाबत त्यांच्याही सूचना त्यांनी जाणून घेतल्या. प्रामुख्याने दूध दराबाबत झालेल्या चर्चेबाबत सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती श्री विखे पाटील यांनी दिली.

दूध भेसळ रोखण्यासाठी शासन कठोर कार्यवाही करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, पशुसंवर्धन विभागाचे सुनिल तुंभारे यांच्यासह अधिकारी, राहूल शिंदे, विश्वनाथ कोरडे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!