नगर प्रतिनिधी / जितू शिंदे : आमदार निधीतून मंजूर झालेल्या सभा मंडपाच्या वर्क ऑर्डरसाठी सरपंचाकडून लाच घेताना जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागातील कनिष्ठ सहायकाला पकडले आहे. कनिष्ठ सहायक संतोष बाळासाहेब जाधव (वय 39, रा. विद्या काॅलनी, कल्याण रोड, नगर) असे पकडलेल्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयातील पथकाने ही कारवाई केली.
तक्रारदार नगर तालुक्यातील जांभळी गावच्या सरपंच आहेत. गावासाठी आमदार निधीतून 15 लाख रुपयांचा सभामंडप मंजूर झाला आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीने प्रशासकीय मान्यता दिली. या कामाच्या वर्क ऑर्डरसाठी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे प्रस्ताव होता. यावर अजून वर्क ऑर्डर झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागातील कनिष्ठ सहायक जाधव याने सभा मंडपाच्या वर्क ऑर्डरसाठी मंजूर झालेल्या निधीतून दीड टक्के रकमेच्या लाचेची मागणी केल्याचे समोर आले आहे. सरपंच यांनी याबाबत शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयाकडे तक्रार केली.
यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयातील पथकाकडून तत्काळ पडताळणी करण्यात आली. कनिष्ठ सहायक जाधव याने लाचेची रक्कम लगेच स्वीकरण्याची तयारी केली. यावर लाचलुचपत पथकाने सापळ्याची कार्यवाही केली. जाधव याने तक्रारदार आणि पंचासमक्ष 23 हजार रुपये लाचेची मागणी केली. यात तडजोड होऊन 22 हजार 500 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली.
लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपतच्या पथकाने जाधव याला पकडले. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या नगर कार्यालयाचे उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस कर्मचारी संतोष शिंदे, बाबासाहेब कराड, सचिन सुद्रुक, हारून शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सरपंचाकडून लाच घेताना जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायकास लाचलुचपतच्या जाळ्यात ; निलंबनाची कारवाई!

0Share
Leave a reply