Disha Shakti

Uncategorized

शिर्डी येथील साई संस्थान कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांची तडकाफडकी बदली

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शिर्डी येथील साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांना संस्थान मधुन कार्यमुक्त करण्यात आले आहे. अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काल (मंगळवारी) सायंकाळी या संदर्भातील आदेश काढले. विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिवांच्या सल्ल्यानुसार अन्य अधिकार्‍याकडे कार्यभार सोपवून कार्यमुक्त व्हावे व पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी असे आदेशात म्हंटले आहे. गेल्याच आठवड्यात गुरुवारी सर्वपक्षीय शिर्डीकरांच्या शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पी. शिवा शंकर यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी तातडीने पी. शिवा शंकर यांना कार्यमुक्त करण्यात आले. मंदिर परिसरातील चप्पल बंदी, देशभरात साई मंदिर उभारणीसाठी निधी देण्याच्या प्रस्तावाची घोषणा वादग्रस्त ठरल्या. या विरोधात ग्रामस्थांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते. कर्मचार्‍यांना शिस्त लावतांना बर्‍याचदा अतिरेक होत असल्याच्या भावनेने कर्मचारीही नाराज झाले होते.

रुबल अग्रवाल यांच्या नंतर संस्थानमध्ये कोणत्याही आयएएस अधिकार्‍यांला कार्यकाल पूर्ण करता आला नाही. यातील काहीजण वादग्रस्त झाले. या पार्श्वभूमीवर शिर्डीकरांनी साई संस्थानला आयएएस अधिकार्‍यांची आवश्यकता नाही. त्या ऐवजी पूर्वीप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी केली आहे. मात्र एका याचिकेवर निर्णय देतांना सर्वोच्च न्यायालयाने संस्थानचा कारभार बघण्यासाठी आयएएस अधिकारी नेमण्याचे निर्देश दिलेले आहेत. याबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करून हा आदेश रदबदली साठी प्रयत्न करावेत अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे. साईबाबा संस्थान मध्ये नवीन कोण कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त होते याबाबत संस्थान कर्मचारी व ग्रामस्थांमध्ये उत्कंठा वाढली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!