अहमदनगर प्रतिनिधी / शेख युनूस : पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील पुनर्वसन जमीन सर्व्हे नंबर ३५२ पैकी ०.८० आर व सर्व्हे नंबर १६६ पैकी ०.८० आर जमीनीची तात्काळ नोंद व्हावी, यासाठी मुळा धरणामध्ये जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र पारनेर तहसीलदारांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविल्याने प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीची नोंद होणार असल्याने आंदोलन स्थगित केले आहे.
अनिल कुशाबा बिडकर, शरफुद्दीन जमाल शेख, पुंजा जबाजी बाचकर, सिराज बन्नुभाई शेख, गंगुबाई यादव लेंभे, सोपान नाना जाधव यांनी मंत्र्यांसह व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले होते. त्यानुसार पारनेर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल सादर केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अहवालात तहसीलदारांनी म्हटले आहे की, पारनेर तालुक्यातील पुनर्वसन जमिन सर्वे नंबर ३५२ पैकी ०.८० आर व सर्वे नंबर ११६ पैकी ०.८० आर जमिनीची नोंद न झाल्यास अनिल बिडकर, शरफुद्दीन शेख व इतर ५ हे जलसमाधी आंदोलन करणार असल्याचे पत्रान्वये कळविले होते. त्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकरी दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी तहसिल कार्यालयात उपस्थित राहून त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे सादर केली आहे.
त्यानुषगाने, मौजे वनकुटे येथील वाटप आदेशातील खातेदार मुक्ता सुबाना बिडकर, शरपुद्दिन जमालभाई, अहिला रामा बाचकर, महादू लक्ष्मण लेंभे, बाबू सज्जनभाई, बाजीराव वना इरोळे, संभु रभा शिंदे असे नावे असून त्यांनी तहसील कार्यालयात तोंडी कथन केलेप्रमाणे आदेशातील खातेदार यांच्याशी अनिल बिडकर (नातू), शरपुद्दिन शेख (स्वतः), पुंजा बाचकर (नातू), गंगूबाई लेंभे (दीर), सिराज शेख (नातू), संजय इरोळे (नातू), आण्णासाहेब शिंदे (मुलगा) असा नाते संबंधाचा खुलासा सादर केलेला आहे.
तसेच सदरची जमिन वाटप झालेचे नमुद केलेले आहे. वनकुटे तलाठी यांच्या पत्रानुसार गट नंबर ८७/१ व १८४ जमिनीमध्ये शेतकरी पिके घेतात असे नमुद असून सदरची जमिन प्रकल्पग्रस्तांच्या ताब्यात आहे.
वनकुटे येथील जमिन सर्वे नंबर ३५२ वरील फेरफार क्रमांक २७/०३/१९७० अन्वये मुळची फॉरेस्ट असलेली जमिन क्षेत्र २०४ एकर जमिन पुनर्वसनकडे वर्ग करण्यात येवून तसे पुनर्वसनच्या ताब्यात दिल्याचे दिसून येत आहे. फेरफार क्रमांक १८३६ दि. १२ फेब्रुवारी १९७२ नुसार २३८ एकर जमीन प्रकल्प पिडीतांचे पुनर्वसनासाठी राखून ठेवण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत जुना सर्वे नंबर ३५२ चा नविन गट नंबर ८७/१ हा झालेला असून ७/१२ उतारा पाहता इतर अधिकारात पुनर्वसनाकरिता क्षेत्र २३८ एकर असा शेरा असल्याचे दिसून येत आहे.
मंडळाधिकारी पळशी यांचा अहवाल दि. २५ फेब्रुवारी २०२३ पाहता वनकुटे येथील जमिन गट नंबर ८७/१ व १८४ हा सरकारी गट असून त्यावर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे अतिक्रमण झालेचे निदर्शनास येत असल्याचा अहवाल तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंद होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Leave a reply