Disha Shakti

Uncategorized

ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट ; पक्ष बदलाच्या चर्चेला उधान

Spread the love

 दिशाशक्ती प्रतिनिधी / गणेश राशीनकर  : शिर्डी लोकसभेसाठी दावेदार मानले गेलेले बबनराव घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट राजकीय नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. असे असले तरी पाच वेळा आमदार राहिलेल्या घोलपांच्या देवळाली मतदारसंघात विविध चर्चांचे पेव फुटले आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेनेकडेच असल्याने तेथे शिंदे गटाकडून घोलपांना उमेदवारी मिळण्याचा दावा कार्यकर्त्यांकडून केला जातो आहे. तर, दुसरीकडे 14 तारखेला घोलप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करू शकतात,अशीही चर्चा सुरू आहे.

देवळाली मतदारसंघ मागील 30 ते 35 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिला. आजही येथील बहुसंख्य कडवट शिवसैनिक ठाकरे गटाबरोबर कायम आहेत. राज्यात सत्ता कोणतेही असली तरी देवळाली मतदारसंघाने बबनराव घोलपांना साथ दिली. याचमुळे ते सतत पाचवेळा विधानसभेत गेले. मात्र, अण्णा हजारे यांच्या आरोपांच्या गर्तेत सापडलेल्या घोलपांना पुढे अनेक राजकीय अडचणींचा सामना करावा लागला. निवडणूक लढविण्यास त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. ही बंदी अद्याप कायम आहे. मात्र, त्यांनी आपला मुलगा योगेश याला पुढे केले. राखीव गटात आलेल्या शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी बबनराव घोलप यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश मिळाले नाही. आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीने पुन्हा घोलपांच्या सक्रियतेचा मुद्दा पुढे आला.

आज सकाळपासूनच घोलप शिंदे गटात जाणार अथवा ते 14 तारखेला भाजपत प्रवेश करणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते हा दबावतंत्राचा भाग असू शकतो, असे स्पष्ट करण्यात आले. घोलप कुटुंबीय आजही उबाठा गटापासून पूर्ण दूर झालेले नाही. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा असून, शिंदे आणि उबाठा गटाकडून येथे प्रत्येकी एक उमेदवार देण्यात येईल. हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे जाण्याची शक्यता कमीच असल्याने घोलपांच्या भाजपप्रवेशाची चर्चा लवकरच हवेत विरेल, असा दावाही राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येतो आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!