Disha Shakti

राजकीय

नगर दक्षिणेतील लोकसभा जागा लढण्यावर लंके कुटुंबीय ठाम

Spread the love

वसंत रांधवण / विशेष प्रतिनिधी (पारनेर) : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी मी व आमदार निलेश लंके इच्छुक आहेत. समोर कोण आहे,याचा विचार आम्ही करीत नाहीत. आम्ही कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच आहोत, अशी भूमिका जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणीताई लंके यांनी मांडली. यामुळे लंके कुटुंब लोकसभा निवडणूक लढण्यास ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या दक्षिणेत डॉ. सुजय विखे पाटील भाजपचे खासदार आहेत. त्यामुळे लंके – विखे यांच्यातील लढतीसह दक्षिणेत संघर्ष वाढणार आहे.

पारनेरचे आमदार निलेश लंके राष्ट्रवादीकडून लढणार असल्याची चर्चा आहे. तेव्हापासूनच विखे – लंके यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर निलेश लंके अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सामिल झाले. त्यामुळे विखे – लंके यांच्यातील संघर्ष कमी होईल अशी शक्यता होती. मात्र स्थानिक पातळीवर मात्र विखे – लंके यांच्यातील राजकीय संघर्ष कायम आहे. हि जागा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या गटाला सुटते की भाजपकडेच राहते हे पाहणे महत्त्वाचे असले तरी लंके यांनी मात्र लोकसभा निवडणूक लढण्याचा निश्चय कायम ठेवला आहे. बुधवारी राणीताई लंके यांनी मोहटादेवी गड (ता. पाथर्डी) येथे जाऊन देवीचे दर्शन घेत शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी लोकसभा लढण्याचे जाहीर केले.

लोकसभा निवडणुकीचाच एक भाग म्हणून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास साडेतीन वर्षे पूर्ण झाल्याने शिवरायांचे चरित्र नगर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घराघरांत व मनामनात पोहचवण्यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे. पंधरा दिवसांनंतर निलेश लंके यांच्या उपस्थितीत नगर येथे यात्रेचा समारोप केला जाणार आहे असेही राणीताई लंके यांनी सांगितले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!