Disha Shakti

इतर

नगर अर्बन बँक घोटाळा : फक्त शाखाधिकार्‍यांना अटक करून खरोखर सूत्रधार सापडतील का ?

Spread the love

प्रतिनिधी / जितू शिंदे :  नगर अर्बन बँकेतील सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेने दोन व्यक्तींना अटक केली होती . दोन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली असून कर्ज मंजुरी प्रकरणात कर्जाच्या रकमा लूज चेकद्वारे काढण्याचा त्यांच्यावर ठपका आहे . विशेष म्हणजे कर्ज मंजुरी देण्यासाठी या व्यक्तींना सर्वाधिकार होते का ? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे.नियम डावलून कर्ज वाटप करण्यासाठी कुणी ‘ अदृश्य शक्ती ‘ पाठीमागून आदेश देत होती का ? याचा खऱ्या अर्थाने पोलिसांनी तपास करून करण्याची गरज असल्याचे मत ठेवीदारांनी व्यक्त केलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , राजेंद्र शांतीलाल लुणिया ( राहणार अहमदनगर ) आणि शाखाधिकारी प्रदीप जगन्नाथ पाटील ( राहणार अहमदनगर ) अशी दोन्ही अटक केलेल्या व्यक्तींची नावे असून बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर अर्बन बँकेतील 28 संशयित प्रकरणात फसवणूक तसेच दीडशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल आहे. ठेवीदार सध्या आर्थिक अडचणींनी त्रस्त झालेले असून सोशल मीडिया तसेच वेगवेगळी आंदोलने करून प्रशासनाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

नव्याने आलेले तपासी अधिकारी तथा उपाधीक्षक हरीश खेडकर यांनी गुन्ह्याच्या तपासासाठी काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले होते त्यानंतर लुणिया आणि पाटील यांना तात्काळ अटक करण्यात आली. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यावेळी पोलीस दलाच्या वतीने आरोपींकडे कर्जाच्या रकमेचे वितरण तसेच यात कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास करण्यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती त्यानुसार त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

नगर अर्बन को-ऑपरेटिव बँकेत झालेल्या गैरव्यवहाराबद्दल गुन्हे दाखल होऊन कित्येक दिवसांपासून चौकशीचाच घाट सुरू आहे मात्र त्यामुळे हतबल झालेल्या ठेवीदारांना न्याय मिळत नसून ठेवीदारांनी आसूड आंदोलनासोबत इतर आंदोलने देखील केली मात्र प्रशासनावर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. ठेवीदारांना न्याय मिळत नसल्याने ठेवीदार व्यक्तींवर आर्थिक अरिष्ट कोसळलेले आहे.नगर अर्बन बँकेतील ठेवीदारांमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असून अनेक महिलांनी त्यांची आयुष्यभराची कमाई या बँकेमध्ये ठेवलेली होती मात्र पद्धतशीरपणे काही राजकीय प्रभाव असणाऱ्या व्यक्तींकडून त्यावर ‘ डल्ला ’ मारण्यात आला आणि आज रोजी ठेवीदारांना वेगवेगळ्या ठिकाणी न्यायासाठी उंबरठे झिजवावे लागत आहेत . उत्कर्षाताई रूपवते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन या प्रकरणी तात्काळ आरोपींच्या विरोधात कारवाई सोबत ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केलेली आहे


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!