विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवन : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे संत गितेबाबा यांच्या मठाच्या विविध कामाचे भूमिपूजन झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ. रोहित पवार बोलत होते. शरद पवार यांच्या वयावरून अजित पवारांकडून वारंवार मुद्दा समोर आणला जात असताना भारतीय जनता पक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना ऑफर देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चेवर आमदार रोहित पवार यांनी टीका केली.भाजप सगळ्यांनाच ऑफर देते, त्यांच्याकडे वय वर्ष ८० झालेले लोक खासदार झालेले आहेत. मात्र कुठेतरी अजितदादा मित्र मंडळाचे नेते जो वयाचा मुद्दा पवार साहेबांबद्दल बोलतात त्याला पाठबळ देण्याचं भाजप काम करत असताना दुसरीकडे अशा ऑफर दिल्या जात असल्याचे रोहित पवार म्हणाले.
पूर्वी काही नेत्यांचा रुबाब आपण पाहत होतो, मात्र काही नेत्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यात चार मोठे नेते मागील सीटवर दाटीवाटीने बसताना दिसत आहेत, अशी टीका आ. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केली. दिल्लीमध्ये चर्चा नव्हे तर आदेश दिले जातात आणि त्यामुळे कुठेतरी कुणाला सहा जागा, कोणाला आठ जागा दिल्या जाण्याची चर्चा आहे आणि राहिलेल्या जागा हे भाजप लढवेल असे चित्र दिसत असल्याचं रोहित पवार म्हणाले. भाजपमध्ये हुकूमशाही तर आमच्या राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमधे लोकशाही असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महाजनता पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले की, काल एकंदरीत उद्धव ठाकरे कमी बोलले मात्र दुसरीकडे शिवसेनेचे वकील आणि तज्ञ मंडळी यांनी एकूणच सर्व खटला सविस्तरपणे जनतेसमोर मांडला आहे. त्याचबरोबर शिवसेना सोडून गेलेल्या अनेक नेत्यांचे फोटो काल दाखवण्यात आले, ज्यात हेच सोडून गेलेले नेते पक्षप्रमुखांचे पाय धरताना दिसत आहेत. त्यामुळे लगेच विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. यामुळे त्यांना कुठेतरी कुणाचा आदेश पाळावा लागतोय काय असं दिसून येत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली.
Leave a reply