Disha Shakti

क्राईम

श्री.सुद्रीकेश्वर महाराज मंदीराचे गाभाऱ्यातील सर्व चांदीच्या दागिन्यासह ०३ सराईत आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगरची कारवाई

Spread the love

विशेष बातमी / इनायत अत्तार : प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक १२/०२/२०२४ रोजी रात्रीचे वेळी श्री. सुद्रीकेश्वर महाराज मंदीर, पारगांव सुद्रीक, ता. श्रीगोंदा या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदीराचे गाभान्याचे कुलूप तोडुन मुर्तीचे पाठीमागील व समोरील बाजुस बसविलेले चांदीचे अर्धगोलाकार आकाराची प्रभावळ, मुर्तीचे चौथन्याचे समोरील चांदीचे आभुषण असे चांदीचे २४,००,०००/- रुपये किमतीचे दागिने चोरुन नेलेले होते. सदर बाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. १४०/२०२४ भादवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी सदर गावातील ग्रामदैवताचे मंदीरातील चोरीचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेवुन लागलीच पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन आरोपींची गुन्हा करण्याची कार्यपध्दतीची माहिती घेवुन स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, अतुल लोटके, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, अमृत आढाव, आकाश काळे, भाऊसाहेब काळे, रणजित जाधव, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, संतोष खेरे, देवेंद्र शेलार, उमाकांत गावडे व अर्जुन बडे यांचे पथक तयार करुन आरोपीची माहिती काढणेकामी पथकास आवश्यक सुचना देवुन रवाना केले.

स्थागुशा पथक हे मंदीरामधील सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच यापुर्वी मंदीर चोरीचे गुन्हे करणारे आरोपींचा अभिलेख तपासुन तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे माहिती काढत असतांना सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी नामे १) भास्कर खेमा पथवे रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर याने व त्याचे साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस पथकाने नांदुरी दुमाला या ठिकाणी जावुन आरोपीची माहिती काढली असता सदर आरोपी हा नांदुरी दुमाला गावचे शिवारातील डोंगरावर राहत असुन त्याचे घराकडे जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने व लांबुनच त्याचे घराकडे कोणी आल्याचा त्यास संशय आल्यास तो डोंगरामध्ये पळुन जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यामुळे पोलीस पथकाने आरोपीचे राहते घराचे आजुबाजुस पायी जावुन डोंगरात २ दिवस मुक्काम केला व आरोपी घरी आल्याची माहिती प्राप्त होताच त्याचे घरास चोहोबाजुने घेरुन त्यास ताब्यात घेतले व त्याचेकडे मंदीर चोरीचे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे २) राजु उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे वय ३० वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, ३) भाऊराव मुरलीधर उघडे वय ३६ वर्षे, रा. विटा, ता. अकोले यांचेसह गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यातील चोरी केलेले चांदीचे दागिने हे भाऊराव उघडे याचे राहते घरामध्ये पुरुन ठेवले असल्याचे सांगुन सदरचे दागिने काढुन दिले आहेत.

ताब्यात घेण्यात आलेले आरोपी नामे १) भास्कर खेमा पथवे वय ४६ वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर, २) राजु उर्फ राजेंद्र ठकाजी उघडे वय ३० वर्षे, रा. नांदुरी दुमाला, ता. संगमनेर व ३) भाऊराव मुरलीधर उघडे वय ३६ वर्षे, रा. विटा, ता. अकोले यांचेकडुन श्री. सुद्रीकेश्वर महाराज मंदीर, पारगांव बु, ता. श्रीगोंदा येथे चोरी करण्यासाठी वापरलेली मोटार सायकल, चोरी केलेले सर्व चांदीचे दागिने असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला हजर केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!