दौंड प्रतिनिधी / किरण थोरात : दौंडचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची तडकाफडकी बदली झाली आहे. सर्वसामान्यांशी थेट बोलणार्या आणि समस्या सोडविणार्या अधिकार्याची अवघ्या ३४ दिवसांत त्यांची बदली झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक म्हणून चंद्रशेखर यादव यांनी १ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला होता. मात्र ५ मार्च रोजी रात्री त्यांची पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या मुख्यालयातील नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली करण्यात आली.
दौंड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुरकुंभ एमआयडीसी मधील अर्थकेम कंपनीत २० फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात मेफेड्रोन या अमली पदार्थाचा बाराशे कोटी रूपये मूल्य असलेला ६०० किलोचा साठा सापडला होता. सदर कंपनीवर पुणे पोलिसांकडून कारवाई केली जात असताना पुणे ग्रामीण पोलिस दलाला त्याचा थांगपत्ता देखील नसल्याने त्याचा ठपका ठेवत चंद्रशेखर यादव यांची बदली झाल्याची चर्चा आहे. मरगळ आलेल्या दौंड पोलिस ठाण्याच्या कारभारात चंद्रशेखर यादव यांनी अमुलाग्र सुधारणा करीत गुन्हे अन्वेषणावर भर दिला होता. कारवाईत सातत्य ठेवत त्यांनी महिनाभरात ३१ संशयित आरोपींना अटक करण्याची कामगिरी केली होती.
चंद्रशेखर यादव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात नियंत्रण कक्षात संलग्न करण्यात आल्याची माहिती दिली. कुरकुंभ मध्ये बाराशे कोटी रूपये मूल्य असलेला मेफेड्रोनचा साठा जप्त करण्यात आला होता. त्या अनुषंगाने चंद्रशेखर यादव यांची बदली झाल्याची चर्चा आहे. परंतु मेफेड्रोन निर्मिती, साठा व वाहतूक प्रकरणाची आंतरराष्ट्रीय व्याप्ती पाहता पोलिस निरीक्षकांच्या वरील वरिष्ठांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
Leave a reply