Disha Shakti

राजकीय

शिर्डी लोकसभेच्या तिकीटावरून शिंदे गटात वाद उफाळला; अनेक पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळून आला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात पक्षातच नाराजी असल्याचं समोर आलंय. याच नाराजीतून शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे दिले आहेत. त्यामुळे शिर्डीत शिंदे गटाला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. गेल्या १० वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको, अशी भुमिका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे.सदाशिव लोखंडे यांनी मतदारसंघात कोणतेही ठोस कामे केली नाहीत. पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही. त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं, असा सवालही पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे. 

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत सदाशिव लोखंडे यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राजीनामे दिले आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे पदाधिकारी विजय जगताप यांनी दिली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आजवरची निवडणूक कधीही विकासाच्या मुद्यावर झाली नाही. केवळ जातीय समीकरण आणि पक्षबदलामुळे झालेली नाराजी यातून लोखंडे दोनदा खासदार झाले. मात्र, शिर्डीचा कोणताही विकास त्यांनी केला नसल्याची खंत शिंदे गटाचे पदाधिकारी शरहप्रमुख रामपाल पांडे आणि पदाधिकारी सुभाष उपाध्ये यांनी बोलून दाखवली आहे. दुसरीकडे मतदारसंघातील जनताही लोखंडे यांच्यावर नाराज आहे त्यामुळे त्यांना परत उमेदवारी दिली तर पराभवाला सामोरे जावं लागू शकतं त्यामुळे हि जागा भाजपला द्यावी अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे खासदार सदाशिव लोखंडे यांची डोकेदुखी वाढली असून महायुती शिर्डीच्या जागेबाबत काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचे ठरणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!