Disha Shakti

क्राईम

टाकळीभान जवळील हॉटेल चालकाच्या खुनाचा उलगडा ; पोलीस निरीक्षक धनंजय यांची युक्ती व आरोपी ५० पैशात पकडला…

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभानच्या सीमेवरील कारवाडी गावच्या हद्दीतील ओम साई हॉटेल चालक बाळासाहेब तुवर यांच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात नेवासा पोलीसांना यश आले असून खुनाच्या गुन्हयातील तपासात श्वानाची मोठी मदत झाली असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी सांगितले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की कारवाडी गावच्या हद्दीत ओम साई या हॉटेलचे चालक बाळासाहेब सखाहरी तुवर वय ६० वर्षे रा.पाचेगाव यांच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने डोक्यावर कोणत्या तरी टणक वस्तूने प्रहार करून खून केल्याचा प्रकार दिनांक १३ मार्च २०२४ रोजी उघडकीस आला होता. याबाबत पोलीस ठाणे नेवासा येथे गु.र नं. २५१/ २०२४ भा.द.वि. क.३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास पोलिस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे करीत होते. गुन्ह्याच्या तपासकामी पोलिसांनी आव्हान स्वीकारून स्थानिक पोलीस स्टेशनकडील पाच पथके व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक असे एकूण सहा पथके मागील नऊ दिवस-रात्र तपास करीत होते. तपासाच्या दरम्यान पोलिसांना मिळालेल्या वेगवेगळ्या ३४ प्रकारच्या इन्फॉर्मेशनवर मागील नऊ दिवस पोलीस तपास पडताळणी करीत होते. गुन्ह्याच्या संबंधाने जवळपास १२० लोकांकडे तपासणी करण्यात आली होती.

घटनास्थळापासून साधारण ३०० मीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपावरील रात्रीच्या वेळचे अस्पष्ट आणि अंधुक सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करताना घटनेच्या दिवशी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीची आणि श्वानाची हालचाल पोलिसांना दिसून आली होती. पोलिसांनी तपासा दरम्यान सदर अंदाजे ३० वर्षे वय असलेली व्यक्ती आणि श्वान हाच केंद्रबिंदू निश्चित करून मागील नऊ दिवस त्यावरच तपास केला होता. तपासामध्ये अशी वय वर्ष ३० असलेली कोणती व्यक्ती आहे की मृतकचा सदर व्यक्तीशी वाद भांडण वितृष्ट होते आणि सदर व्यक्तीकडे श्वान (कुत्रा) आहे याच्यावर लक्ष केंद्रित केले होते. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपी काही व्यक्तींना नक्की माहिती असणार आहे हे तपाशी अधिकारी धनंजय जाधव पोलीस निरीक्षक जाणून होते.

परंतु सदर व्यक्ती समोर येण्यास भीत घाबरत असल्याने पोलीस निरीक्षक धनंजयं जाधव यांनी पोस्टातून ५० पैशाचे १०० कार्ड विकत घेऊन त्या कार्डावर स्वतःचे नाव आणि पत्ता स्वतःच लिहून सदरचे कार्ड कारवाडी आणि पाचेगाव शिवारामध्ये वाटप करून आपल्याला आरोपी माहीत असल्यास या कार्डवर फक्त आरोपीचे नाव लिहून सदरचे कार्ड आपण कोणत्याही पोस्ट पेटीत टाकावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन कार्डद्वारे सदरचा खून पोपट सुदाम सूर्यवंशी या व्यक्तीने वैयक्तिक भांडणातून केला असल्याबाबत माहिती दिली होती.

पोलिसांनी पोपट सुदाम सूर्यवंशी या व्यक्तीस शिताफिने ताब्यात घेऊन पॉलिसी भाषेत विचारपूस केली असता सुरुवातीस त्याने उडवा उडविची उत्तरे दिली परंतु पोलिसांनी खाकी दाखवताच पोपट हा पोपटासारखा बोलू लागला. आरोपी पोपट सुदाम सूर्यवंशी रा. कारवाडी याने सदर खून केल्याबाबतची कबुली दिली व जागा दाखवली. काही दिवसापूर्वी मृतक हा चिकन घेऊन दुसऱ्या घरी बनवण्यास घेऊन जात असताना मृतक याची आरोपी बरोबर भेट झाली होती. त्यादरम्यान त्यावेळी तू दुसऱ्याच्या घरी चिकन बनवायला का घेऊन जातो यावरून आरोपी आणि मृत्यूकचा वादविवाद झाला होता त्यावेळी मृतकने आरोपीस मारहाण केली होती. याचा राग मनात धरून आरोपीने त्याचा काटा काढायचे ठरवले होते.

मंगळवार दि.१३/३/२०२४ रोजी घटनेच्या दिवशी आरोपी हा मृतक यांच्या हॉटेलवर गेला तेथे त्याने मृतकच्या डोक्यामध्ये दगडाने घाव केले आणि तेथून तो पळून गेला अशी कबुली त्याने दिली आहे. सदरचा तपास अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा येथील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस हवालदार बबन तमनर, पोलीस हवालदार केदार, पोलीस हवालदार कुसळकर, पोलीस नाईक गांगुर्डे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित करंजकर, नारायण डमाळे, गणेश फाटक, अंबादास जाधव, आप्पासाहेब तांबे व योगेश आव्हाड यांनी केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!