Disha Shakti

राजकीय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का, नीलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात नगरमधून लोकसभा लढणार

Spread the love

पारनेर विशेष प्रतिनिधी /वसंत रांधवण : गेल्या अनेक दिवसांपासून नीलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाकडून अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यासंबंधीचा अंतिम निर्णय त्यांनी जाहीर केलेला असून आमदारकीचा राजीनामा देऊन ते शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा निवडणूक लढणार आहेत.

मी देव पाहिला नाही, पण देवासारखा श्रेष्ठ माणूस ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांमध्ये मी पाहिला. त्यांनी मला सांगितले की निलेश तूच लोकसभा निवडणूक लढ. पवार साहेबांच्या शब्दापुढे आमदारकी काय चीज आहे, असे भावनिक सुरात सांगून नीलेश लंके यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नगर-पारनेर विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देताना ते प्रचंड भावुक झाले होते. फक्त पारनेरकर नाही तर अख्खा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आपल्या निर्णयाकडे डोळे लावून बसलाय. आता व्हायचं ते होऊ दे पण माघार घेणार नाही, असे सांगत नीलेश लंके यांनी शरदचंद्र पवार गटाकडून लोकसभा लढणार असल्याची घोषणा केली.

आमदार नीलेश लंके यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपे येथे कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट घेतली. लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शरद पवार गटात जाणे गरजेचे असल्याचे अधोरेखित करून त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवत असल्याचे सांगितले. इथल्या सर्वशक्तीमान सत्ताधाऱ्यांना हरवायचं असेल तर त्याआधी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागेल. आमदारकीचा राजीनामा देताना मला खूप वेदना होतायेत, जनतेने मला माफ करावे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी डोळ्यात अश्रू आणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही माफी मागितली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!