ज्ञानेश्वर सूरशे / नेवासा : गोठ्यातील शेण-मुत्र सोडण्यात – येणाऱ्या बायोगॅसच्या विहिरीत पडलेले मांजर वाचविण्याच्या प्रयत्नात एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. तालुक्यातील वाकडी शिवारात आज मराठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याला दुपारी 4 वाजता ही काळीज पिळवटून टाकणारी दुदैवी घटना घडली. या घटनेनंतर वाकडी गावात शोककळा पसरली आहे.
विहिरीत पडलेल्या सहा जणांना वाचविण्याचे प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, जुनाट विहीर असल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आले नाही. या सहा जणांपैकी एकाला वाचविण्यात आले असून त्याला पुढील उपचारासाठी नगरला पाठविण्यात आले आहे. या घटनेत बबलू अनिल काळे (वय 28), अनिल बापूराव काळे (वय 55), माणिक गोविंद काळे (वय 65), संदीप माणिक काळे (वय 32), बाबासाहेब गायकवाड (वय 40) या पाच जणांचा मृत्यू झाला असून विजय माणिक काळे (वय 35) हे वाचले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
वाकडी येथील अनिल बापूराव काळे यांच्या वस्तीजवळ वापरात नसलेली 40 ते 50 फूट खोलीची जुनी विहीर आहे. या विहिरीत जनावरांच्या गोठ्यातील शेण-मूत्र सोडले जाते. आज गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी चार वाजता या विहिरीमध्ये मांजर पडले. त्या मांजरीला काढण्यासाठी विशाल अनिल काळे उर्फ बबलू (वय 28) हा विहिरीमध्ये उतरला. त्याला विहिरीचा अंदाज न आल्याने विहिरीतील शेण-मूत्रमिश्रित पाण्यामध्ये तो बुडू लागला. ते पाहून त्याचे वडील अनिल बापूराव काळे (वय 55) हे विहिरीत उतरले. तेही बुडू लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी माणिक गोविंद काळे (वय 65) हे विहिरीत उतरले. त्यानंतर संदीप माणिक काळे (वय 32) हे विहिरीत उतरले. त्यांना वाचविण्यासाठी विजू माणिक काळे (वय 35) हे विहिरीत उतरले. हे सर्व विहिरीत उतरल्यानंतरही कोणीच कोणाला वाचू शकत नसल्याचे लक्षात आल्याने त्यांचा गडी बाबासाहेब गायकवाड (वय 40) हाही विहिरीत उतरला. एकमेकांना वाचविण्यासाठी एकापाठोपाठ उतरलेले 5 जण विहिरीतील शेण-पाणीमिश्रित गाळामध्ये अडकल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला.
यावेळी ग्रामस्थासह सरपंच आणि प्रशासनाने या सहा जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. विजय माणिक काळे (वय 35) हे विहिरीतील गॅसने गुदमरल्यामुळे त्याला नगर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नेवासाचे तहसीलदार डॉ. संजय बिराजदार, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे घटनास्थळी पोहोचले असून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक रेसिक्यू टीमसह वाकडी येथे पोहोचत आहेत. विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी ग्रामस्थांसह प्रशासनाकडून रात्री उशीरापर्यंत प्रयत्न सुरू होते.घटनेची माहिती समजताच शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, अंकुशराव काळे यांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य केले.
Leave a reply