विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, पत्रकारिता,कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या कुशल नेतृत्वाने त्यांनी दिन दलितांच्या अंध:कारमय जीवनात प्रगतीची पहाट उगविली. विविध क्षेत्रांत स्वहित न बघता देशहिताला प्राधान्य देणाऱ्या डॉ. आंबेडकर यांच्यामुळे आपला वैभवशाली देश अखंडपणे उभा असुन जगात बलशाली, समृद्ध व आधुनिक भारत घडवण्यासाठी त्यांची मूल्ये आत्मसात करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नुकताच महाराष्ट्र राज्य शासनाचा आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेले रावसाहेब झावरे सर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त टाकळीढोकेश्वर येथील बुद्ध विहार कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रावसाहेब झावरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ते म्हणाले, समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता या अनमोल मुल्यांची समाजाला शिकवण देऊन बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आयुष्यभर लढा दिला. अस्पृश्यता निवारण, शेतकरी, महिलांच्या हक्कांसाठी अविरत कार्य केले.
हिंदू कोड बिल आणुन महिलांना चुल आणि मुल या जोखडातून बाहेर काढले. त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी दिली, अधिकार दिले. म्हणून आज आपल्या देशातील महिला एवढी प्रगती करू शकल्या आहेत. आपला देश प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याचे सर्वांचेच स्वप्न असून हे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची मूल्ये जोपासावी लागणार असल्याचे रावसाहेब झावरे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी निलेश लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब खिलारी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रावण गायकवाड, सरपंच सौ. अरुणा खिलारी, उपसरपंच रामभाऊ तराळ, माजी उपसरपंच सुनील चव्हाण, माजी सरपंच सौ. सुनिता झावरे, ग्रामपंचायत सदस्य दिपक साळवे, मळिभाऊ रांधवण, अंकुश पायमोडे, विहान गायकवाड, लखण आल्हाट, प्रकाश इघे , मंथन गायकवाड, पत्रकार वसंत रांधवण, पत्रकार विनोद गायकवाड, प्रमेश्वर गायकवाड,रोहन गायकवाड,व भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply