राहुरी प्रतिनिधी / जावेद शेख : सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी पक्षांसाठी दिले एक क्विंटल धान्य, मुठभर धान्य पक्षांसाठी या उपक्रमा अंतर्गत हरित सेनेतर्फे विद्यार्थ्यांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी आपल्या घरून बाजरी, गहू, ज्वारी इत्यादी प्रकारचे मुठभर धान्य विद्यालयात जमा केले.थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणे एक क्विंटल धान्य पक्षांसाठी जमा झाले. वातावरणातील बदलामुळे, यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे रानावनात पक्षांना खाद्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
येणारे दीड दोन महिने पाखरांचे हाल होऊ नयेत म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या दातृत्वाची ओळख दाखवत धान्य जमा केले. सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ महानंद माने साहेब यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या दातृत्व गुणांचे कौतुक केले.बालवयात प्राणी,पक्षी यांच्या विषयीची आपुलकीची भावना नक्कीच प्रेरणादायी आहे. असं मत त्यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाचे कौतुक सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील , सभापती डॉ.प्रमोद रसाळ, खजिनदार महेश घाडगे, मुख्याध्यापक अरूण तुपविहिरे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब खेत्री, पर्यवेक्षक मनोज बावा, प्रा.जितेंद्र मेटकर, शिवशाहीर गणेश शिंदे, कांबळे सर यांनी केले.हरित सेनेचे सचिव तथा उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे आणि तुकाराम जाधव यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
Leave a reply