Disha Shakti

इतर

आजारपणाचे खोटे कारण देऊन बंदोबस्त टाळणे भोवले; पोलीस शिपाई निलंबित

Spread the love

पिंपरी  / किरण थोरात : लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोली येथे जाण्याचे आदेश दिले असताना आजारी असल्याचे खोटे कारण सांगून बंदोबस्तासाठी गैरहजर राहणाऱ्या पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयातील पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. भूषण अनिल चिंचोलीकर असे निलंबित केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार १२ ते २१ एप्रिल या कालावधीसाठी लोकसभा निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीला जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये चिंचोलीकर यांचाही समावेश होता.

१० एप्रिल रोजी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची मुख्यालयात हजेरी घेतली असता चिंचोलीकर तेथे गैरहजर राहिले. तसेच दूरध्वनीवरून आजारी असल्याचे मुख्यालयास कळविले. त्यांच्या आजारपणाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय काळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चिंचोलीकर हे जुलाब, उलटी, ताप, पोटदुखीचा त्रास होत असल्याने औषधोपचारासाठी आपल्याकडे वैद्यकीय तपासणीसाठी आले होते, असे सांगितले. त्यांना दाखल करून घेवून तपासण्या करण्यास सांगितले होते. मात्र, चिंचोलीकर यांनी कोणत्याही तपासण्या केल्या नाहीत. तसेच, चिंचोलीकर यांना होत असलेला त्रास हा गंभीर स्वरूपाचा नसल्याचे सांगितले.

अतिमहत्त्वाच्या बंदोबस्तासाठी नेमणूक केलेली असतानाही जाणीवपूर्वक आजारी असल्याबाबत खोटे कारण सांगून बंदोबस्त चुकविण्यासाठी चिंचोलीकर गैरहजर राहिले. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करून आदेशाची अवहेलना केली. तसेच, कर्तव्यात गंभीर स्वरूपाची कसुरी केली. त्यांचे हे वर्तन बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, चिंचोलीकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी दिले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!