Disha Shakti

इतर

कोपरगाव येथील दुय्यम कारागृहात कैद्यांना व्हीआयपी सुविधा? मोबाईल, दारु आणि ड्रग्ज पुरवल्याचा आरोप, प्रशासनावर प्रश्नचिन्ह

Spread the love

कोपरगाव प्रतिनिधी / विट्ठल ठोंबरे :  कोपरगाव शहरात असलेल्या दुय्यम कारागृहात काही आरोपींना मोबाईल, दारू आणि अंमली पदार्थांसह व्हीआयपी सुविधा मिळत असल्याची माहिती कारागृहातील काही आरोपींकडून मिळाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून पोलीस आणि तुरुंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. खरंच तुरुंगात अशा प्रकारच्या व्हीआयपी सुविधा आरोपींना मिळत आहेत का? याची चौकशी वरिष्ठ प्रशासनाने करण्याची गरज आहे.

कोपरगाव तहसील कार्यालयाच्या जवळ असलेल्या दुय्यम कारागृहाचे नुकतेच नूतनीकरण झाले असून प्रत्येक बॅरेकमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. असे असताना देखील विविध गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडे मोबाईल असल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर जेलमध्ये बाहेरचे जेवण, दारू आणि गांजा तसेच विविध अमली पदार्थ देखील उपलब्ध होत असल्याची माहिती आहे. कोपरगाव कारागृहातील ठराविक कैद्यांना इतक्या व्हीआयपी सुविधा का? असा सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

प्रशासन काय कारवाई करणार?
मागील वर्षी जेलमध्ये विविध अंमली पदार्थ आढळले होते आणि त्यावेळी तत्कालीन पोलीस अधिकार्‍याने सदर प्रकरण दाबले असल्याची देखील चर्चा आहे. खरंच दुय्यम कारागृहातील कैद्यांना अंमली पदार्थ, मोबाईल, दारु हे उपलब्ध होते का? उपलब्ध होत असेल तर हे पुरवतो तरी कोण? याची माहिती पोलीस आणि कारागृह प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेण्याची गरज आहे. त्यासाठी कारागृहात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत प्रशासनाने घ्यावी. जर जेलमध्ये खरोखर ठराविक कैद्यांना व्हीआयपी सुविधा मिळत असेल तर हा प्रकार गंभीर असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची तात्काळ दखल घेण्याची गरज आहे. आता ही सर्व परिस्थिती पाहता प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करून काय कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल.

व्हीआयपी सुविधा मिळणारे कैद्यांचा जेलमध्येच राडा
व्हीआयपी सुविधा मिळणाऱ्या आरोपींनी जेलमध्येच राडा घातला असून गुटखा विक्रीतील गुन्ह्यातील एका आरोपीला लाथा बुक्क्यांनी आणि कैचीने जबर मारहाण केली आहे. या आरोपीला गंभीर दुखापत झाली आहे. हा संपूर्ण प्रकार त्याने न्यायालयात सांगितल्याने न्यायालयाच्या सूचनेनुसार सदर जखमीच्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोपरगावच्या कारागृहात सध्या बॅरॅकमधील काही आरोपींनी आत टोळी बनवली असून नवीन आरोपी आल्यास किंवा एखादा विशिष्ट समाजाचा आरोपी त्यात गेल्यास त्याच्यावर लघवी करणे, त्याला निवस्त्र करणे, त्याला मारहाण करून धमकावणे, अश्लील कृत्य करून त्याला त्रास देणे असे प्रकार सध्या सुरू असल्याची माहिती आहे. या सर्व प्रकरणांना आळा बसावा आणि पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी यासाठी सोमवारी एका समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

अधिकारी म्हणतात असं काहीच नाही
कोपरगावच्या दुय्यम कारागृहात आरोपींना मोबाईल, दारू, अमली पदार्थ पुरवले जात असल्याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की आम्ही मागील आठवड्यात सर्व बॅरेकची तपासणी केली असून त्यामध्ये काहीही आढळले नाही. मात्र सदर तुरुंगातून जामीनवर सुटलेल्या काही आरोपींनी व्हीआयपी सुविधेबाबत सदरची हकीकत सांगितलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने पुन्हा बॅरेक तपासणी करून सीसीटीव्ही कॅमेराची मदत घ्यावी आणि संबंधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त आरोपी
कोपरगाव दुय्यम कारागृहात पाच बॅरेकमध्ये २४ कैद्यांची क्षमता असून सध्या या कारागृहात ८५ कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे एका बॅरेकमध्ये १५ पेक्षा अधिक कैदी आहे. त्यामध्ये सराईत गुन्हेगार देखील असून कोपरगाव कारागृहात व्हीआयपी सुविधा मिळत असल्याने आरोपी इतर तुरुंगात जाण्याचे नावच घेत नाही अशी देखील माहिती आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!