विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव औटी यांचे शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे)पक्षातून पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे निलंबन करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी पत्रक जाहीर केले असून या निर्णयाने पारनेर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे, आता माजी आमदार विजयराव औटी काय भूमिका घेतात याकडे तालुक्याचे नव्हे तर जिल्हयाचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार विजयराव औटी यांनी कालच पत्रक काढून लोकसभा निवडणुकीत भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांना पाठींबा जाहीर केला होता. परंतु त्यांच्या निर्णयाविरोधात जाऊन आपण पक्षाच्या भूमिकेसोबत असून उध्दव ठाकरे यांचा आदेश मानणार असल्याचे जाहीर करत पारनेर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी अहमदनगर येथे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली होती, यावेळी पारनेर तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
त्यानंतर लगेचच जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना पाठवला आणि लगेच माजी आमदार विजयराव औटी यांच्या निलंबनाचे आदेश पक्ष कार्यालयातून आल्याचे गाडे यांनी जाहीर केले व तसे पत्रक काढले आहे. आता या निर्णयाचे तालुक्यात काय पडसाद उमटतात व माजी आमदार विजयराव औटी काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. १५ वर्ष शिवसेनेकडून औटी हे आमदार होते व मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते जास्त राजकारणात सक्रिय नव्हते परंतु त्यांनी बाजार समिती निवडणुकीत महाविकासआघाडीबरोबर निवडणुक लढवली होती व आमदार निलेश लंके यांच्यासोबत ते एकत्र आले होते.
लोकसभा निवडणुकीत औटी काय भुमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते व त्यांनी उमेदवार जाहीर होऊन निवडणुक लागल्यावर भुमिका जाहीर करू असे सांगितले होते व त्यानुसार त्यांनी शिवसैनिकांशी चर्चा करून आपला निर्णय जाहीर केला होता, परंतु शिवसैनिकांना त्यांचा निर्णय जाहीर पटला नव्हता आणि सर्व पदाधिकाऱ्यांनीही व शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात जाऊन महाविकास आघाडी बरोबर राहण्याची घोषणा केली व त्यानंतर माजी आमदार औटी यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचा अहवाल वरिष्ठांना प्राप्त झाल्यावर औटी यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराव भास्करराव औटी यांनी काल दि.१ मे रोजी पत्रकार परिषदेमध्ये महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांना पाठिंबा देणेबाबत भूमिका घेतली, परंतु आपला पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षासोबत महाविकास आघाडी असून निलेश ज्ञानदेव लंके हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे आपण घेतलेली भूमिका ही पक्ष विरोधी असल्याकारणाने पक्षश्रेष्ठींच्या आदेशाने आपले पक्षातून तातडीने निलंबित करण्यात येत आहे.
– शिवसेना जिल्हाप्रमुख नगर दक्षिण
प्रा. शशिकांत गाडे
Leave a reply