Disha Shakti

राजकीय

पारनेर तालुका (ऊबाठा)शिवसेनेची उद्या बैठक! जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांची उपस्थिती, तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांची माहिती

Spread the love

विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : लोकसभा निवडणूकी संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेची उद्या शनिवार दि. ४ मे रोजी सकाळी ११ वाजता पारनेर शहरातील सेनापती बापट स्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुका प्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांनी दिली. पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे यावेळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, शिवसेना शाखाप्रमुख, युवा सेना शाखा प्रमुख, महिला आघाडी पदाधिकारी तसेच शिवसैनिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारनेर तालुक्यातून भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना पाठींबा असल्याचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, माजी आमदार विजय औटी यांनी १ मे रोजी जाहिर केले होते. त्यांच्या घोषणेपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मते जाणून घेतली होती.

पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच आपण मदत करणे क्रमप्राप्त असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी दोन दिवसानंतर आपण आपला निर्णय जाहिर करू असे औटी यांनी सांगितले होते.पदाधिकाऱ्यांच्या भुमिकेस छेद देत दोन दिवसानंतर मात्र विजय औटी यांनी सुजय विखे यांना पाठींबा जाहिर केला. औटी यांची ही भूमिका पदाधिकाऱ्यांना रूचली नाही. जिल्हाप्रमुख प्रा. गाडे यांनीही पदाधिकाऱ्यांना जाब विचारत नगर येथे तातडीने बैठक बोलविली.

या बैठकीत आम्ही महाविकास आघाडीसोबत असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केले. पत्रकार परिषदेत तशी घोषणा केली. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारा संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी प्रा. गाडे यांच्या उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!