Disha Shakti

इतर

एकादशीनिमित्त आळंदीला गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला एर्टिगा-एसटी बसच्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Spread the love

श्रीगोंदा प्रतिनिधी / राहुल कोठारे : एकादशी निमित्त आळंदीला दर्शनासाठी गेलेल्या पारगाव (ता. श्रीगोंदा) येथील भाविकांच्या वाहनाला परतीच्या वाटेवर श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवारात अपघात झाला. या अपघातात चार जण ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. पारगावहून गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ असे आठ जण दर्शनासाठी गेले होते. त्यातील एक जण पुण्याला जाण्यासाठी आळंदीतच थांबल्याने अपघातातून बचावला. शनिवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

भाविकांच्या एर्टिगा कारची एसटी बसशी धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एर्टिगा कारमधील पारगाव सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ लक्ष्मण ननवरे (वय ५५), संस्थेचे सदस्य हरी तुकाराम लडकत (वय ६०), ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके (वय ५५) आणि दत्तात्रय बळीराम खेतमाळीस (वय ६०) यांचा मृत्यू झाला आहे. तर कारचालक विठ्ठल गणपत ढोले (वय ३६ रा. लोणी व्यंकनाथ), रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस (वय ७०) आणि रोहिदास सांगळे (वय ७२) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

श्रीगोंदा ते शिरूर जाणाऱ्या रस्त्यावर ढवळगाव शिवारात हा अपघात झाला. आळंदीहून येणारी भाविकांची एर्टिगा कार आणि बेलवंडीहून शिरूरकडे जाणारी एसटी बस यांच्यात धडक झाली. ढवळगाव परिसरातील कुकडी चारी क्रमांक ३४ च्या वळणावर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि ग्रामस्थ मदतीला धावले. जखमींना शिरूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी असलेल्या तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.एकादशी असल्याने हे सर्वजण आळंदीला दर्शनासाठी सकाळीच गेले होते. दर्शन घेऊन परत येताना हा अपघात झाला. या गाडीतून गावातील गोपीनाथ हिरवे हेही गेले होते. त्यांचा मुलगा पुण्यात असतो. त्याला भेटायला जाण्यासाठी ते परत न येता आळंदीमध्येच थांबले होते. त्यामुळे ते अपघातातून बचावले आहॆ.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!