विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : पारनेर येथिल सभेत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना पुन्हा एकदा धमकी दिल्याचे दिसून आले. निलेश बेटा, तू ज्या शाळेचा विद्यार्थी आहे, त्याचा मी हेडमास्तर आहे. यंदा तुझा कंड जिरवतो. तू खासदार कसा होतो, ते बघतोच,अशा शब्दांत अजित पवार यांनी लंके यांना धमकावले आहे.
अजित पवार म्हणाले,तू माझ्या नादी लागू नको. महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले,त्यांचा पुरता बंदोबस्त केला आहे. तू तर किस झाड की पत्ती आहे. तू फार शहाणपणा करु नको. मी जोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत राहतो. जर तू आमच्या माणसाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या केसाला जरी धक्का लावाल तर तुला बघून घेईन. या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने त्या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा, असे आवाहन पवार यांनी केले.
नगर मतदारसंघातील महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी पारनेर येथे आयोजित केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेत शेतकऱ्यांनी दादा, कांद्यावर बोला, अशी मागणी केली. मात्र, पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने उपस्थित नागरिकांनी ` रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी ‘ च्या घोषणा दिल्या त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
अजित पवार यांचे पारनेरमध्ये आगमन झाल्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उशिरा सुरू झालेल्या सभेसाठी जेमतेम उपस्थिती होती. सभेमध्ये अजित पवार यांनी पारनेर मधील पतसंस्था, साखर कारखाना कोणी अडचणीत आणला,असा सवाल उपस्थित करीत पारनेर तालुक्यातील विविध प्रश्नांना स्पर्श केला. २००४ साली कुकडी प्रकल्पातून २ टीएमसी पाणी देण्याचा शब्द देण्यात आला होता. त्याचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पारनेरचे हक्काचे पाणी दिले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी अजित पवार यांना कांदा प्रश्नावर बोलण्याची विनंती केली. मात्र पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष करीत सुजय विखे यांना कामाची जाण आहे. ते संसदेत तुमचे प्रश्न चांगले मांडू शकतील, असे पवार सांगत राहिले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भर सभेत ` रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी ‘ च्या घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Leave a reply