Disha Shakti

राजकीय

मतदान करू नये म्हणून पैसे देऊन बोटाला लावली शाई लंके यांनी केली तक्रार ; बोगस मतदान केल्याचा आरोप

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : मला मतदान होऊ नये, म्हणून मतदान केंद्रांच्याबाहेर पैसे देऊन मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचे प्रकार झाले. जेणेकरून मतदार मतदानालाच जाऊ नयेत. विखे समर्थक श्रीपाद जाधव याला हा प्रकार करताना आपण रंगेहाथ पकडले, अशी माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

लंके म्हणाले, भिंगार शहरातील स्टेट बैंक चौकात हा प्रकार घडला आहे. काही लोक पैसे देऊन मतदारांच्या बोटाला निळी शाई लावत होते. त्याबदल्यात मतदारांना पैशांचे वाटप केले गेले. यातील शाई लावणारा विखे कुटुंबाचा लोणी येथील ठेकेदार आहे. त्याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे लंके म्हणाले. मुस्लीम व मागासवर्गीय मतदार हे मतदान केंद्रात गेल्यावर भाजपला मतदान करणार नाहीत, ही भीती सत्ताधाऱ्यांना होती. त्यामुळे लोकांनी मतदानच करू नये, यासाठी पैसे देऊन त्यांच्या बोटांना शाई लावली गेली, असे लंके समर्थकांचे म्हणणे आहे.लंके यांनीही असाही आरोप केला की, या निवडणुकीत पैशांचा अक्षरशः पाऊस पडला.

पाथर्डी तालुक्यात मतदान केंद्रात अधिकाऱ्याकडे भाजपाच्या उमेदवाराचे प्रचार पत्रक सापडले. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली; पण त्यांनी तुम्ही असा व्हिडीओ कसा काय काढला, असा प्रश्न केला. माळीवाडा येथील एका अधिकाऱ्याने एका महिलेचे मतदान केले. पारनेर तालुक्यातील भोईरे गांगर्डे येथेही अशीच घटना घडली. तेथेही अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागरिकाचे मतदान केले. हे मतदान केंद्र बंद केले गेले. नंतर पुन्हा सुरू झाले.

पारनेरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाकडूनच पैसे पकडले; पण पोलिसांनी काहीही केले नाही. तिसगाव येथेही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्व प्रकारांबाबत अनेक तक्रारी केल्या. परंतु, दखल घेतली गेली नाही. प्रशासन एकतर्फी काम करत आहे. असे प्रकार यापूर्वीच्या निवडणुकांत पाहिले नाहीत, असे लंके म्हणाले. यावेळी उद्धवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड आदी उपस्थित होते.पोलिसांनीच भाजपचा प्रचार केला दरम्यान, लंके यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले.

आपण ज्या हॉटेलवर थांबलो त्या हॉटेलवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाया केल्या. या शाखेतील एका कर्मचाऱ्याने तर आम्हाला लंके समर्थकांना ताब्यात घेण्याचे सक्त आदेश आहेत, असे सांगितले. तसेच त्याने शेवगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांनाही भाजपला मतदान करण्यास सांगितले. या सर्व प्रकाराचे व्हिडीओ आपल्याकडे आहे. कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकारी यास जबाबदार आहेत, असे लंके म्हणाले. प्रशासनाने चोखपणे काम केले आहे. कोठे अनुचित प्रकार घडल्याच्या तक्रारी असतील तर त्यातील पुरावे तपासून कारवाई केली जाईल. मतदारांना शाई लावली गेली वा अन्य तक्रारी असतील तर नियमानुसार चौकशी केली जाईल.

–राकेश ओला, पोलिस अधीक्षक


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!