Disha Shakti

राजकीय

कमळ फुलणार की तुतारी वाजणार; महाराष्ट्राचे लागले लक्ष, अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६३. ७७ टक्के मतदान

Spread the love

विशेष प्रतिनिधी अ.नगर / वसंत रांधवण : राज्यात बहुचर्चित ठरलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी कोणाला कौल दिल्याची चर्चा रंगली असताना मतदानाची अंतिम आकडेवारी पाहता अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक ६३. ७७ टक्के मतदान नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तर ६३.९७ टक्के मतदान पारनेर विधानसभा मतदारसंघ झाले आहे. १९ लाख ८१ हजार ८६६ इतके मतदान असून यापैकी १२ लाख ६३ हजार ७८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून याची टक्केवारी ६३. ७७ टक्के इतकी आहे.

सहा विधानसभा मतदारसंघाती मतदान केंद्रनिहाय झालेल्या आकडेवारीवरून उमेदवारांच्या समर्थकांनी निकालाची अंदाजबांधणी सुरू केली आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निवडणूक घोषित झाल्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे महाराष्ट्रात अहमदनगर दक्षिण हा हाॅट लोकसभा मतदारसंघ ठरल्याचे चित्र पहावयास मिळाले. भाजप महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपाकडून पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अजित पवार गटाला रामराम ठोकत आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेतली. भाजपाला एकतर्फी वाटणारी निवडणूक अचानक अटीतटीची झाली. निवडणुकीच्या काळात या मतदारसंघात अनेक दिग्गजांच्या सभा तर झाल्याच पण मतांची जुळवणी करण्यासाठी अनेकांनी पक्षीय बदल करून नवीन समिकरणे जुळवली. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही मोठी चुरशीची पहावयास मिळाली. १३ मे रोजी झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून जाहीर झाली आहे.

अहमदनगर दक्षिणेत मतदानात पुरुष पुढे

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघात चुरशीने मतदान झाल्याचे टक्केवारीवरून स्पष्ट होत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात एकुण १९ लाख ८१ हजार ८६६ इतके मतदान असून यापैकी १२ लाख ६३ हजार ७८१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून याची टक्केवारी ६३.७७ टक्के इतकी आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात १० लाख ३२ हजार ९४६ पुरुष तर ९ लाख ४८ हजार ८०१ स्त्री आणि इतर ११९ मतदार आहेत. त्यापैकी ६ लाख ८९ हजार ७८२ पुरुष तर ५ लाख ७३ हजार ९५४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून महिलांपेक्षा पुरुष मतदार मतदानात पुढे आले.

सहा मतदारसंघनिहाय झालेले मतदान पुढीलप्रमाणे

*शेवगाव – एकुण मतदान ३ लाख ६१ हजार १९४ इतके असून यापैकी २ लाख २६ हजार ६१९ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६२.७४ टक्के इतकी आहे.
*राहुरी – एकुण मतदान ३ लाख ११ हजार ७४५ इतके असून यापैकी २ लाख १७ हजार ५६५ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६९.७९ टक्के आहे.
*पारनेर – एकुण मतदान ३ लाख ४० हजार ९७५ इतके असून यापैकी २ लाख १८ हजार १३४ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६३.९७ टक्के इतकी आहे.
*अहमदनगर शहर – एकुण मतदान ३ लाख २० हजार ८३ इतके असून यापैकी १ लाख ७४ हजार मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ५७.६० टक्के इतकी आहे.
*श्रीगोंदा – एकुण मतदान ३ लाख २८ हजार ९६६ इतके असून यापैकी २ लाख ५७ हजार ३६ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६२.५४ टक्के इतकी आहे.

कर्जत- जामखेड – एकुण मतदान ३ लाख ३६ हजार ९०३ इतके असून यापैकी २ लाख २१ हजार ७२७ मतदारांनी मतदान केले असून याची टक्केवारी ६५.८१ टक्के इतकी आहे.

कर्जत जामखेड व पारनेर लीड कोणाला देणार ?

मतदारसंघात निवडणुकीस उभारलेल्या उमेदवारांच्या समर्थकांकडून विधानसभा आणि मतदान केंद्रनिहाय झालेल्या मतांच्या आकडेवारीवरून विजयाचे अंदाज बांधण्यास सुरुवात झाली आहे. आपल्या उमेदवारासाठी अनुकूल कोणत्या पट्ट्यात किती मतदान झाले याची चर्चा आता मतदारसंघात रंगू लागली आहे. कर्जत – जामखेड , पारनेर आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात कोणाला लीड देणार त्यावर सर्वकाही अवलंबून आहे. सध्या चर्चा रंगल्या असल्या तरी गुलाल कोण उधळणार हे येत्या ४ जून रोजीच कळणार असून या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कमळ फुलणार की तुतारी वाजणार याकडे आख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!